शाळेतील गीता पठणावरून वाद, भाजपच्या मागणीला समाजवादी पार्टीचा तीव्र विरोध; महापौरांना लिहिलं पत्रं

| Updated on: Feb 18, 2022 | 12:31 PM

महापालिकेच्या शाळांमध्ये गीता पठण सुरू करण्याची मागणी भाजपने केली आहे. भाजपच्या या मागणीला समाजवादी पार्टीने कडाडून विरोध केला आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये भागवत गीतेचं पठण करण्यात येऊ नये, अशी मागणी समाजवादी पार्टीने केली आहे.

शाळेतील गीता पठणावरून वाद, भाजपच्या मागणीला समाजवादी पार्टीचा तीव्र विरोध; महापौरांना लिहिलं पत्रं
शाळेतील गीता पठणावरून वाद, भाजपच्या मागणीला समाजवादी पार्टीचा तीव्र विरोध
Follow us on

मयुरेश गणपत्येय, मुंबई: महापालिकेच्या शाळांमध्ये  (bmc school) गीता पठण सुरू करण्याची मागणी भाजपने केली आहे. भाजपच्या या मागणीला समाजवादी पार्टीने कडाडून विरोध केला आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये भागवत गीतेचं पठण करण्यात येऊ नये, अशी मागणी समाजवादी पार्टीने केली आहे. समाजवादी पार्टीचे नगरसेवक आणि आमदार रईस शेख यांनी तसे पत्रच महापौर किशोरी पेडणेकर यांना लिहिलं आहे. भाजपची ही मागणी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे. त्यामुळे ही मागणी फेटाळून लावण्यात यावी, तसेच भाजपची ठरावाची सूचनाही फेटाळून लावण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पार्टीने केली आहे. त्यामुळे गीता पठणाच्या मुद्द्यावरून महापालिकेत भाजप आणि समाजवादी पार्टी आमनेसामने येण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच हा मुद्दा येत्या निवडणुकीत तापण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

भाजपच्या नगरसेविका योगिता कोळी यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे शाळांमध्ये गीता पठण सुरू करण्याची मागणी केली होती. त्याला समाजवादी पार्टीचे नगरसेवक आणि आमदार रईस शेख यांनी विरोध केला आहे. शेख यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून आपला विरोध दर्शविला आहे. भाजपची मागणी फेटाळून लावा. महापालिका निवडणुकीत मतांचं ध्रृवीकरण करण्यासाठीच त्यांनी ही मागणी केली आहे. हा भाजपचा अजेंडा आहे, असं शेख यांनी पत्रात म्हटलं आहे. तसेच महापालिकेच्या शाळांमध्ये कोणत्याही प्रकारे धार्मिक शिक्षणाचा प्रस्ताव मंजूर केला जाणार नाही असं गटनेत्यांच्या बैठकीत ठरलं होतं, याकडेही शेख यांनी महापौरांचं लक्ष वेधलं आहे.

योगिता कोळींची मागणी काय होती?

योगिता कोळी यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली होती. भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान विषयक ग्रंथ आहे. तसेच हा ग्रंथ वेदांच्या अखेरच्या रचनेतील ‘गीतोपनिषद’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे. 5000 वर्षांपूर्वी 25 डिसेंबर या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा पडली आहे. भगवत्‌ गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे.

हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते. सामान्य जनांमध्ये भगवत्-गीता, ‘गीता’ या नावाने ओळखली जाते. हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे या गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला ‘मोक्षशास्त्र’ म्हणले गेले आहे. तरी ही वस्तुस्थिती लक्षात घेता बृहन्मुंबई महापालिकेचे असे ठाम मत आहे कि, बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांमधून भगवत गीता पठन केले जावे. जेणेकरून भावी पिढीवर योग्यप्रकारचे संस्कार होतील, असं कोळी यांनी म्हटलं होतं.

महापौरांच्या निर्णयाकडे लक्ष

दरम्यान, येत्या महापालिका सभेत हा मुद्दा गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. योगिता कोळी यांची ठरावाची सूचना महापौर सभागृहात चर्चेसाठी मांडतात की फेटाळून लावतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या:

चोर, लफंगा, खंडणीखोर, राऊतांनी सकाळी सकाळी रॉकेट सोडलं, अन्वय नाईकला आत्महत्या करायला लावल्याचाही आरोप

VIDEO: किरीट सोमय्या वेडा माणूस, भाजपला भुताटकीनं झपाटलं; राऊतांची जोरदार टोलेबाजी

तरुणाचं अपहरण, बायकोची तक्रार आणि भीमापात्रात मृतदेह, आळंदीतील हत्येचं गूढ उकललं