Sanjay Raut: कितीही आकडेमोड करा, राज्यसभेची सहावी जागा शिवसेनाच लढेल, विरोधकांना घोडेबाजार सुरू करायचाय का?: संजय राऊत

| Updated on: May 18, 2022 | 5:28 PM

Sanjay Raut: भाजपच्या वाट्याला राज्यसभेच्या दोन जागा आल्या आहेत. मात्र, तरीही भाजप तिसरा उमेदवार देऊन सहाव्या जागेसाठीची चुरस वाढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Sanjay Raut: कितीही आकडेमोड करा, राज्यसभेची सहावी जागा शिवसेनाच लढेल, विरोधकांना घोडेबाजार सुरू करायचाय का?: संजय राऊत
विरोधकांना घोडेबाजार सुरू करायचाय का?: संजय राऊत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: पुढील महिन्यात राज्यसभेची निवडणूक होत आहे. राज्यातील सहा जागांसाठी मोठी चुरस रंगली आहे. या सहा जागांपैकी दोन जागा भाजपच्या वाट्याच्या आहेत. तर प्रत्येकी एक जागा शिवसेना (shivsena), राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वाट्याची आहे. मात्र, सहाव्या जागेसाठी रस्सीखेच होताना दिसत आहे. स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) हेही राज्यसभेच्या मैदानात उतरल्याने चुरस अधिकच वाढली आहे. संभाजी राजेंना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, शिवसेनेने संभाजीराजेंना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. संभाजी छत्रपती यांनी शिवसेनेत यावं तरच त्यांना पाठिंबा देऊ असं शिवसेनेने म्हटलं आहे. तसेच सहाव्या जागेसाठी शिवसेना उमेदवार देणार असल्याचं शिवसेनेने जाहीर केलं आहे. भाजपनेही तिसरा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्याचे संकेत आहेत. त्यामुळे सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

हे सुद्धा वाचा

विरोधकांना घोडेबाजार सुरू करायचाय का?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून भाजपला फटकारले आहे. विरोधकांना घोडेबाजार सुरू करायचा आहे काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय. भ्रष्टाचारातून पैसा, त्यातून घोडेबाजार! हे दुष्ट चक्र कधी थांबेल?, असा सवाल करतानाच सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करावी. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे . जितेंगे, असं सूचक विधान राऊत यांनी केलं आहे.

राऊतांनी आघाडीला गृहित धरलंय

राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये शिवसेना सहावी जागा लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच या सहाव्या जागेसाठीची आकडे आणि मोड महाविकास आघाडीकडे आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. याचाच अर्थ शिवसेनेच्या सहाव्या जागेवरील उमेदवाराला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल असं राऊत यांना म्हणायचं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने संभाजी छत्रपती यांना पाठिंबा दिलेला असतानाही राऊत यांनी हे विधान केल्याने शिवसेना राष्ट्रवादीला गृहित धरतेय का? असा सवाल केला जात आहे.

राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट, काँग्रेस सायलन्स

राष्ट्रवादीने संभाजी छत्रपती यांना जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. मात्र, काँग्रेसने अद्यापही आपले पत्ते खोलले नाहीत. त्यामुळे काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार की संभाजी छत्रपतींना पाठिंबा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजप तिसरा उमेदवार देणार?

भाजपच्या वाट्याला राज्यसभेच्या दोन जागा आल्या आहेत. मात्र, तरीही भाजप तिसरा उमेदवार देऊन सहाव्या जागेसाठीची चुरस वाढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मागच्यावेळी भाजपने संभाजी छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवले होते. पण आपण भाजपचे खासदार नसून राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्याचं संभाजी छत्रपती सांगायचे. तसेच संभाजी राजे यांनी राज्यसभेच्या कार्यकाळात आपल्याच पद्धतीने धोरणे राबवली. भाजपच्या कोणत्याही अजेंड्यावर त्यांनी काम केलं नव्हतं. त्यामुळे त्यांना भाजपकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचं सांगितलं जात आहे.