
मुंबईत ३० मजली बिहार भवन उभारण्यावरून महाराष्ट्र आणि बिहारच्या राजकारणात नवा कलगीतुरा रंगला आहे. बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी आम्ही मुंबईत बिहार भवन बांधूनच दाखवू, कोणाच्या बापात हिंमत असेल तर रोखून दाखवा असे आव्हान केले आहे. या विधानाचा समाचार घेताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच या मुद्द्यावरुन त्यांनी बिहार सरकारला सडेतोड उत्तर दिले आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भारतीय संविधानाने प्रत्येकाला देशात कुठेही राहण्याचा आणि काम करण्याचा अधिकार दिला आहे. हे संविधान आम्हालाही माहिती आहे. पण बिहारच्या मंत्र्यांनी वापरलेली भाषा अधिक संयमी आणि सौम्य असायला हवी होती. मुंबईत आधीच अनेक राज्यांची भवने आहेत, पण ज्या पद्धतीने बिहारचे मंत्री आव्हान देत आहेत, ते चुकीचे आहे, असे संजय राऊत म्हणाले.
यासोबत संजय राऊत यांनी बिहार सरकारकडे एक महत्त्वाची अट ठेवली आहे. तुम्हाला मुंबईत बिहार भवन बांधायचे असेल तर त्यासाठी जमीन मुंबईचीच वापरावी लागेल, ती काही तुम्ही पाटण्यातून आणणार नाही. मग आमचीही मागणी आहे की, ज्याप्रमाणे तुम्ही मुंबईत जागा मागत आहात, त्याचप्रमाणे बिहार सरकारने पाटण्यातील गोला रोड किंवा न्यू पाटलीपुत्र कॉलनी सारख्या मोक्याच्या ठिकाणी महाराष्ट्राला ५ ते ६ एकर जागा द्यावी. तिथे आम्ही ३० माळ्यांचे भव्य महाराष्ट्र भवन उभारु, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे.
आम्हाला बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभं करायचं आहे. महाराष्ट्रातील असंख्य लोक बिहार, पाटण्याला जातात. आम्हालाही ३० माळ्यांचे महाराष्ट्र भवन पाटण्याला उभारण्याची संधी मिळावी. ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे, असं मी मानतो. जर बिहारी बांधव आमचे असतील तर मराठी बांधवांना तुम्ही तिथे स्वीकारलं पाहिजे. ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे. ती संपूर्ण देशभरात स्वीकारायला हवी. फक्त मुंबईवरच आक्रमण का? असा सवाल संजय राऊतांनी केला.
मुंबईची अवस्था समजून घ्या. जर तुम्हाला जागा हवीच असेल, तर गौतम अदानींकडून बाजारभावाने ती विकत घ्या. सरकारकडून मोफत किंवा सवलतीच्या दरात जागा हवी असेल, तर आधी सांस्कृतिक देवाणघेवाण करा. महाराष्ट्रातील असंख्य लोकही बिहारला जातात, त्यांनाही तिथे राहण्याची सोय मिळायला हवी. मुंबईत जर जागा हवी असेल तर गौतम अदानींकडून बाजारभावाने घ्यावी, सरकारकडून हवी असेल तर सरकारने त्याबदल्यात बिहार सरकारकडे ५ ते ६ एकर गोला रोड, न्यू पाटलीपूत्र कॉलनी हे महत्त्वाचे चांगले भाग आहेत. चांगले रस्ते आहेत. तिथे आम्हाला जागा द्या. आमची काहीही अडचण नाही. आम्ही देशाचे संविधान मानणारे लोक आहोत. तुमच्यासारखे आकांत तांडव करणारे लोक आम्ही नाहीत. पण मुंबईची अवस्था तुम्ही समजून घ्या. मुंबईत विनाकारण वातावरण बिघडेल असे वक्तव्य करु नका, असा इशारा संजय राऊतांनी केला.