उदय सामंत यांना ठाकरे गटाचा बडा नेता भेटला, ऑपरेशन टायगर होणार? राऊतांची पहिली प्रतिक्रिया काय?

ठाकरे गटाचे भास्कर जाधव आणि मंत्री उदय सामंत यांच्या भेटीमुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत 'ऑपरेशन टायगर'चे वृत्त फेटाळले. सामंत हे राज्याचे मंत्री असल्याने त्यांना कोणीही भेटू शकते, असे राऊत म्हणाले. तसेच, सामंतांनी पक्ष बदलल्याचे सांगत त्यांच्यावर जोरदार टीकाही केली.

उदय सामंत यांना ठाकरे गटाचा बडा नेता भेटला, ऑपरेशन टायगर होणार? राऊतांची पहिली प्रतिक्रिया काय?
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2026 | 11:09 AM

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. भास्कर जाधव शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उदय सामंत मंत्री आहेत. ते काही एका पक्षाचे मंत्री नाहीत. त्यांना कुणीही भेटू शकतं. आम्हीही अनेक मंत्र्यांना भेटतो. भेट झाली म्हणजे ऑपरेशन टायगर आहे असं काही नसतं, असं संजय राऊत म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.

भास्कर जाधव शिवसेनेचे नेते आहेत. उदय सामंत काही म्हणतात म्हणून भास्कर जाधव निर्णय घेण्याइतके अपरिपक्व नाहीत. उदय सामंत हे उद्योगमंत्री आहेत. पालकमंत्री आहेत. त्यांना भेटलं तर आश्चर्य काय? ते एका पक्षाचे मंत्री नाही. ते राज्याचे मंत्री आहेत. त्यांना कुणी भेटायचं नाही का? काय असतं ऑपरेशन 3.4 मला सांगा बरं? यांच्याच पोटात फुटण्याचा ट्युमर वाढत आहे. सामंतांनी पाच पाच-दहा दहा पक्ष बदलले आहेत. त्यांनी ऑपरेशनची गोष्ट करू नये. हे सडक्या मेंदूचे आहेत, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला.

Loading...

कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

आज शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी होणार आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे आमचं लक्ष आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वातील शिवसेना ही खरी शिवसेना आहे, असं राऊत म्हणाले.

मोठेपण कमी होतं का?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली नाही. त्यावरून भाजपने ठाकरे गटाला डिवचले आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणी श्रद्धांजली वाहिली नाही म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचं मोठेपण कमी होतं का? नाही ना? असा सवाल त्यांनी केला.

काय घडलं?

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांची भेट घेतली होती. भास्कर जाधव यांनी अचानक सामंत यांची भेट घेतल्याने ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यातच उदय सामंत यांनीही ऑपरेशन टायगरचे संकेत दिल्याने या चर्चांना हवा मिळाली होती. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना ऑपरेशन टायगरचे वृत्त फेटाळून लावलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us