पोलीस बढतीत 100 कोटींचा घोटाळा, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप

| Updated on: Jun 24, 2019 | 1:58 PM

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर सडकून टीका करत पोलिसांच्या बढती प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.

पोलीस बढतीत 100 कोटींचा घोटाळा, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर सडकून टीका करत पोलिसांच्या बढती प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. अपात्र कर्मचाऱ्यांची पोलीस उपनिरिक्षकपदावर (PSI) बढती करण्यात आली. यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 5 लाख रुपये घेण्यात आल्याचा खळबळजनक आरोप आव्हाड यांनी केला आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या बढती प्रक्रियेत जवळपास 100 कोटींचा घोटाळा झाल्याचेही आव्हाड यांनी नमूद केले. अपात्र 636 हवलदारांना पीएसआय म्हणून नियुक्त करण्यात आले आणि त्यासाठी त्यांच्याकडून लाच म्हणून प्रत्येकी 5 लाख रुपये घेतल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच राज्य सरकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

636 अपात्र कर्मचाऱ्यांना हवलदार करण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) तशी शिफारस केली आहे का? एमपीएससीच्या कारभारात ढवळाढवळ करण्याचा सरकारला कोणी अधिकार दिला?  ते काम एमपीएससीचं आहे. परिक्षा प्रशासनातील भट घेतो का? असे अनेक प्रश्न आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केले.

‘पुढची दहा वर्ष भरती होणार नाही’

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “636 अपात्र कर्मचाऱ्यांची बढती करण्यात आली. तसेच इतर 1285 जणांचीही यादी आहे. तेही दारोदार फिरत आहेत. त्यातील 10 जण माझ्याकडे येऊन गेले आणि शिफारस पत्राची मागणी करु लागले. मात्र, मी त्यांना ते अपात्र असल्याचे सांगत परत परिक्षा देण्यास सांगितले. म्हणजे हे 1285 आणि ते 636 म्हणजे असे 1900 हून अधिकजण पोलीस उपनिरिक्षक झाले. यामुळे पुढील 10 वर्ष एकही हवलदार पीएसआय होऊ शकत नाही.”