मोदीजी, मी तुमच्याकडे मदतीची भीक मागते : सायरा बानू

मोदीजी, मी तुमच्याकडे मदतीची भीक मागते : सायरा बानू

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीच्या ‘ट्रॅजेडी किंग’च्या आयुष्यातही सध्या ‘ट्रॅजेडी’ सुरु आहे. बिल्डर समीर भोजवानीच्या त्रासाला कंटाळून अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानू यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीची याचना केली होती. मात्र, कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने सायरा बानू यांनी पुन्हा ट्वीट करुन पंतप्रधान मोदींकडे मदतीची ‘भीक’ मागितली आहे.

सायरा बानू यांनी काय विनंती केलीय?

“आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मी तुमच्या भेटीची वाट पाहतेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी प्रयत्न करतोय’ या आश्वासनाचा आता कंटाळा आलाय. दिलीप साहेबांचं घर भूमाफिया समीर भोजवानी याच्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही आता आमची शेवटची आशा आहात. मी तुमच्याकडे मदतीची भीक मागते.”, असे ट्वीट सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांच्या ट्वीटर अकाऊंटवर केले आहे.

याआधीही पंतप्रधान मोदींना विनंती

दोन दिवसांपूर्वीच सायरा बानू यांनी समीर भोजवानीची तक्रार थेट पंतप्रधान मोदींकडे करुन, त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सर आणि पंतप्रधान कार्यालय, भूमाफिया समीर भोजवानी तुरुंगातून सुटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतरही त्याच्यावर कारवाई केली जात नाहीय. समीर भोजवानीकडून दिलीप कुमार यांना धमक्या दिल्या जात आहेत, पैसा आणि बळाचा वापर करुन घाबरवलं जात आहे. तुम्ही आमची मुंबईत भेट घ्यावी, अशी विनंती करते आहे.” असे ट्वीट सायरा बानू यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं.

हे नेमके प्रकरण काय आहे?

दिलीप कुमार आणि सायरा बानू यांचा मुंबईतील पाली हिल्स भागात बंगला आहे. या बंगल्याच्या जागेवर समीर भोजवानीने दावा केला आहे. भोजवानी याने धमकावून या जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. याआधीही सायरा बानू यांनी भोजवानीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर जानेवारी महिनयात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समीर भोजवानीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत, एप्रिलमध्ये त्याला अटकही केली होती.

आता सायरा बानू यांच्या म्हणण्यानुसार, समीर भोजवानी तुरुंगातून बाहेर आला आहे. हेच ध्यानात घेऊन सायरा बानू यांनी ट्वीट करुन, आपली भीती थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलून दाखवली आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील ‘महानायक’ दिलीप कुमार यांनाच सुरक्षितता वाटत नसेल, तर सर्वसामान्यांना काय सुरक्षित वाटणार? अशा प्रतिक्रिया आता सायरा बानू यांच्या ट्वीटखाली नेटिझन्सने देण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून, दिलीप कुमार आणि सायरा बानू यांना मदत करावी, अशा विनंत्याही नेटिझन्स आणि सर्वच स्तरातील लोकांकडून केल्या जात आहेत.

Published On - 10:16 am, Wed, 19 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI