शरद पवार पुन्हा ब्रीच कँडित अ‍ॅडमिट, सुप्रिया सुळे बैठक सोडून तातडीने रुग्णालयात

ज्येष्ठ नेते शरद पवार रुटीन चेकअपसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असून, रुग्णालयात दाखल होताच खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीची बैठक सोडून तातडीने पोहोचल्या. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना दाखल करून घेतले आहे. काही दिवसांपूर्वीही त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार झाले होते.

शरद पवार पुन्हा ब्रीच कँडित अ‍ॅडमिट, सुप्रिया सुळे बैठक सोडून तातडीने रुग्णालयात
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2026 | 12:58 PM

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात आणण्यात आलं आहे. पवार हे रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात आले आहेत. पवारांना रुग्णालयात आणण्यात आल्याचं कळताच राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीची बैठक सोडून ब्रीच कँडीकडे रवाना झाल्या आहेत. पवार यांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं जात आहे. पवारांना भेटल्यानंतर सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती देण्याची शक्यता आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती मधल्या काळात बिघडली होती. त्यांच्यावर पुणे आणि नंतर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. तसेच पवारांना प्रवास टाळण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, प्रकृतीला आराम पडल्यानंतर पुन्हा एकदा पवार सक्रिय झाले होते. त्यांनी कालच पुण्यात एआयने घेतलेल्या ऊस उत्पादनाची माहितीही घेतली होती. मात्र, आज त्यांना थोडं बरं वाटत नसल्याने आणि रुटीन चेकअपसाठी ब्रीच कँडीत आले आहेत. त्यांची प्रकृती तपासल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना अ‍ॅडमिट करून घेतलं आहे.

Loading...

सुप्रिया सुळेंनी बैठका सोडल्या

शरद पवार यांना अॅडमिट केल्याचं कळल्यानंतर सुप्रिया सुळे या तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात आल्या आहेत. रुग्णालयात त्यांनी डॉक्टरांना भेटून पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक सुरू होती. या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, रोहित पवार, अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्षांची बैठक सुरू होती. मात्र, पवारांना अॅडमिट केल्याचं कळताच सुप्रिया सुळेंनी ही बैठक सोडून तडक रुग्णालय गाठलं.

15 दिवसांपूर्वी उपचार

15 दिवसांपूर्वी म्हणजे ऐन दिवाळीत शरद पवार यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं होतं. रुबी हॉल रुग्णालयात दोन दिवस उपचार घेतल्यानंतर पवारांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर पवार मुंबईला आले होते. पण त्याच संध्याकाळी परत त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ब्रीच कँडीतही त्यांच्यावर दोन दिवस उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us