शरद पवार यांची प्रकृती स्थिर, डिस्चार्ज कधी मिळणार? सुप्रिया सुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती

| Updated on: Nov 02, 2022 | 11:59 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

शरद पवार यांची प्रकृती स्थिर, डिस्चार्ज कधी मिळणार? सुप्रिया सुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना खरंतर आज संध्याकाळीच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर सध्या रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. त्यांना उद्या सकाळी अकरा वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

दरम्यान, शरद पवार रुग्णालयात दाखल असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि रोहित पवार यांनी आज ब्रीच कँडी रुग्णालयात येऊन त्यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांनी तब्बल अडीच तास शरद पवार यांच्यासोबत गप्पा मारल्या.

धनंजय मुंडे आणि रोहित पवार रुग्णालयाच्या बाहेर आले तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती दिली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी उद्या सकाळी अकरा वाजता शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली.

हे सुद्धा वाचा

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. “शरद पवार यांची प्रकृती ठिक नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पवार पुढील तीन दिवस रुग्णालयात उपचार घेणार आहेत. ते ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेतील. येत्या 2 नोव्हेंबर रोजी त्यांना संध्याकाळी डिस्चार्ज मिळेल”, असं पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर सांगण्यात आलं होतं.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी पवार शिर्डीत येणार आहेत. तसेच पक्षाच्या 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबीराला ते मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहितीही देण्यात आली होती. याशिवाय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेर गर्दी करु नये, असंही आवाहन करण्यात आलं होतं.