दसरा मेळाव्यावरुन होणार रणकंदन? आता शिंदे गटाकडूनही मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेत अर्ज, आमदारांना दसऱ्याला मुंबईत राहण्याचे आदेश

| Updated on: Sep 02, 2022 | 6:20 PM

शिवसेनेचा दरवर्षी ज्या प्रमाणे दसरा मेळावा होतो, त्याप्रमाणे परवानगी मागिती आहे, असे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी सांगितले. हिंदुत्ववादाचं मार्गदर्शन याच मैदानातून व्हावं, यासाठी परवानगी मागितली आहे. दोन्ही बाजूंनी अर्ज केलेला आहे, त्याबाबतीत निर्णय प्रशासकीय पातळीवर होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हिंदुत्व सोडून कोण कुणाच्या मांडीवर बसलेले आहे, हे राज्याने पाहिले आहे, अशी टीकाही सरवणकर यांनी केली आहे.

दसरा मेळाव्यावरुन होणार रणकंदन? आता शिंदे गटाकडूनही मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेत अर्ज, आमदारांना दसऱ्याला मुंबईत राहण्याचे आदेश
Follow us on

मुंबई- ऐन गणेशोत्सव सुरु असताना राजकीय वर्तुळात वाद सुरु आहे तो दसरा मेळाव्याचा. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता दरवर्षी होणारा शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा, कुणाचा होणार, असा हा वाद रंगला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट या दोन्हींकडून यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा व्हावा, यासाठी परवानगी मिळवण्यासाठीचे पत्र शिवसेनेने २२ ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेला पाठवले आहे. आता एकनाथ शिंदे गटानेही याच जागी दसरा मेळावा व्हावा, यासाठीचे परवानगी मागणारे पत्र मुंबई महापालिकेला पाठवले असल्याची माहिती आहे. तर तिसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दसरा मेळाव्याला संबोधित करावे अशी मागणी मनसैनिकांनी त्यांना पत्र लिहून केली आहे. त्यामुळे आता दसरा मेळाव्याची परवानगी कुणाला मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

शिंदे गटाच्या आमदारांना दसऱ्याला मुंबईत राहण्याचे आदेश

मुबई महापालिकेकडून आता परवानगी कुणाला मिळणार, यावर सगळं ठरणार असल्याचे  सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे गटातील आमदारांना दसऱ्याला त्यांनी मुंबईतच राहावे, असे सांगण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही नुकतेच दसरा मेळावा हा शिंदे गटाचाच व्हायला हवा, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे गटाचे काय म्हणणे ?

अर्ज केला आहे, हे नक्की. शिवसेनेचा दरवर्षी ज्या प्रमाणे दसरा मेळावा होतो, त्याप्रमाणे परवानगी मागिती आहे, असे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी सांगितले. हिंदुत्ववादाचं मार्गदर्शन याच मैदानातून व्हावं, यासाठी परवानगी मागितली आहे. दोन्ही बाजूंनी अर्ज केलेला आहे, त्याबाबतीत निर्णय प्रशासकीय पातळीवर होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हिंदुत्व सोडून कोण कुणाच्या मांडीवर बसलेले आहे, हे राज्याने पाहिले आहे, अशी टीकाही सरवणकर यांनी केली आहे.

..तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न – शिवसेना

याबाबत शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी हा ढोंगीपणा चालला असल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे बाळासाहेबांचे नाव वापरायचे, शिवसेनेचे नाव वापरायचे, भाजपाची मदत घ्यायची. हा बाळासाहेबांचा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बाळासाहेब ठाकरे यांची एक पक्ष, एक झेंडा, एक नेता, एक मैदान ही परंपरा निर्माण केली होती, ती उद्धव ठाकरे यांनी चालवली. पण आता राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी वेगवेगळ्या क्ल्युप्त्या काढल्या जात आहेत. असे त्यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या ५६ वर्षांच्या परंपरेला छेद देऊ नका, असे आवाहनही त्यांनी शिंदे गटाला केले आहे. शिवसेना कुणाची आहे, याचा निर्णय कोर्टात होईल असे त्यांनी सांगितले आहे.

राज ठाकरेंनीच दसरा मेळावा घ्यावा – मनसैनिकाचं पत्र

तर या शिवसेना विरुद्ध शिंदे गट या वादात आता मनसेकडून राज ठाकरेंनाही दसरा मेळाव्याचा आग्रह करण्यात येतो आहे. दसरा मेळावा राज ठाकरे यांनी घ्यावा असे आवाहन करणारे पत्र मनसैनिकानं लिहिले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केले आहे.