‘ज्यांचा शपथविधी सकाळचा झाला तेच राक्षसीवृत्तीबाबत बोलताहेत’, दीपक केसरकरांचा अजित पवारांना खोचक टोला

| Updated on: Nov 04, 2022 | 9:51 PM

"सरकार आणणं, सरकार कोसळवणं हेच अजित पवार यांचे काम आहे", असा घणाघात दीपक केसरकर यांनी केला.

ज्यांचा शपथविधी सकाळचा झाला तेच राक्षसीवृत्तीबाबत बोलताहेत, दीपक केसरकरांचा अजित पवारांना खोचक टोला
Follow us on

मुंबई : राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपसोबत फारकत घेतली होती. त्या काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं एकत्रित सरकार स्थापन होण्यासाठी महाविकास आघाडीची निर्मिती झाली होती. तीनही पक्षाचे प्रमुख नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार होते. पण त्याआधी भल्या पहाटेच एक अनपेक्षित घटना घडली. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आमदारांची यादी घेऊन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजभवनावर दाखल झाले. तिथे त्यांनी भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्रित सरकार स्थापन केलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. अर्थात त्यांनतर काही तासांनी ते सरकार कोसळलं होतं. पण त्याच पहाटेच्या शपथविधीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावलाय.

“सरकार आणणं, सरकार कोसळवणं हेच अजित पवार यांचे काम आहे. जनतेसाठी काम करणं हे आमचं काम आहे. अजित पवार यांनी आमचाही मान ठेवावा. ज्यांचा शपथविधी सकाळचा झाला तेच राक्षसीवृत्तीबाबत बोलत आहेत. आमच्या आणि अजित दादांच्या वागण्यामध्ये फरक आहे”, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला.

“तुमच्या घरात आग लागली, आधी ती विजवा, अजित दादा काय बोलले याकडे शिवसैनिकांनी फारसं महत्त्व देण्याची गरज नाही. कारण यापूर्वी अजित पवार व त्यांच्या पक्षाने चार वेळा शिवसेना फोडलीय आणि ज्यावेळी तुम्ही काँग्रेस सोडून नवीन पक्ष स्थापन केला तेव्हा तुम्हाला हे वाक्य आठवले नाहीत का?”, असा सवाल त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

“अजितदादा अडीज वर्षे सत्तेत होते. आम्हाला तीन महिने झाले आहेत. हे खोट बोललं जातं आहे. टाटाचा एअर बसचा प्रोजेक्ट गुजरातमध्येच प्रस्तावित होता. त्यांना मनपसंत जागा मिळाल्यानंतर तो प्रकल्प तिकडे गेला”, असा दावा केसरकरांनी केला.

“राज्याचे दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी अनेक मोठमोठे कारखाने उभारले. त्यावेळी कोणी का बोललं नाही?”, असा सवाल त्यांनी केला.

“वेदांता प्रकल्प जाणार हे तुमच्या उद्योग मंत्र्यांना माहीत होते. त्यांनी दहा महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते, केंद्राशी भांडुन कोणीच मोठं झालेलं नाही. अडीज वर्षे केंद्राशी कोण भांडत होतं? याचा विचार युवकांनी केला पाहिजे. केवळ कोणीतरी भडकवलं म्हणून त्यांनी वाहत जाऊ नये”, असं दीपक केसरकर म्हणाले.