मुखवट्याचे कारखाने भाजपकडेच, ‘सामना’तून शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र

| Updated on: Jan 22, 2020 | 7:47 AM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे.

मुखवट्याचे कारखाने भाजपकडेच, सामनातून शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र
Follow us on

मुंबई : “शिवसेनेने 2014 मध्ये चेहरा लपवलेला नव्हता. शिवसेना उजळ माथ्याने वावरत होती. मुखवट्याचे कारखाने भाजपकडेच होते”, असा घणाघात शिवसेनेने ‘सामना’ मुखपत्रातून भाजपवर केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला म्हणत शिवसेनेवर टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला शिवसेनेकडून ‘सामना’ मुखपत्रातून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे (Shiv sena ask question to Devendra Fadnavis).

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मुलाखतीत ‘शिवसेनेकडून 2014 मध्येही सत्तास्थापनेचा प्रस्ताव आला होता’, असे वक्तव्य करुन महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या याच वक्तव्याचा दाखला देत भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाल्याचे विधान‌ केले होते. फडणवीस यांच्या याच विधानाला शिवसेनेकडून ‘सामना’तून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे (Shiv sena ask question to Devendra Fadnavis).

“पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्याला 2014 साली कागदाच्या चुरगळलेल्या कपट्याचीही किंमत नव्हती. याचा अभ्यास देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला तर स्वत:च्या चेहऱ्यावरील मुखवटे खाजवत बसण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही”, असे सडेतोड प्रत्युत्तर शिवसेनेकडून देण्यात आलं आहे.

“पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा मुंबईतील सौम्य हवेत विरुन गेला होता. शिवसेना किंवा राष्ट्रवादीने यावर गांभीऱ्याने मत व्यक्त केल्याचे दिसत नाही. पण विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी हा दावा इतका गांभीऱ्याने घेतला की, दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत विझलेली चिलीम फुंकण्याचा ते प्रयत्न करीत होते”, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

“2014 च्या चौरंगी लढतीत भाजप 122 जागा जिंकून मोठा पक्ष ठरला. शिवसेनेने स्वबळावर 63 जागा घेतल्या. काँग्रेसने 42 तर राष्ट्रवादी 41 जागांवर थांबले. लॉजिक म्हणाल तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आजच्याप्रमाणे एकत्र यावे असे जबरदस्तीने ठरवले असते तरी आकडा जमत नव्हता. मारुन मुटकून 149 चा आकडा होता आणि तो धोकादायक होता”, असं ‘सामना’मध्ये म्हटलं आहे.

“2014 साली हिंदुत्व, हिंदू मतांचे विभाजन आणि 25 वर्षांचे नाते यांचा विचार न करता अत्यंत निर्घृण पद्धतीने भाजपने शिवसेनेसोबची युती तोडली. त्यांचा हिंदुत्व वगैरे ढोंग ठरले. हा भाजपचा पहिला मुखवटा उतरला. त्यावेळी शिवसेना विरोधी पक्षात बसण्याच्या मानसिकतेत होती. सरकार स्थापनेचे घोंगडे लटकलेलेच होते आणि ध्यानीमनी नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल पुढे आले आणि भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. येथे भाजपचा दुसरा चेहरा गळून पडला”, असे शिवसेनेने ‘सामना’ अग्रलेखात म्हटले आहे.