
Sushma Andhare On Ladki Bahin Yojana : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. सध्या या योजनेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. असंख्य महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेवरुन आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी जोरदार निशाणा साधला.
“एखादी बहीण तुम्हाला ऐकत नाही, तुम्हाला जाब विचारते तेव्हा तुमच्यातील पुरुष जागा होतो आणि तिच्या बाईपणावर टीका करता. हे संस्कार बाळासाहेबांचे नाही. आनंद दिघेंचे नाही”, अशा शब्दात सुषमा अंधारेंनी टीका केली. शिवसेना ठाकरे गटाच्या पारंपारिक दसरा मेळाव्यावेळी केलेल्या भाषणादरम्यान सुषमा अंधारेंनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल केला.
“१५०० रुपये मिळतात ते काही फडणवीस यांनी नागपूरचा बंगला विकून दिला नाही. शिंदेंनी तापोळ्याची जमीन विकून दिले नाही. हे पैसे आमच्या कष्टाचे आहे. आमच्या राज्यातील नागरिकांनी जो टॅक्स भरला त्याचे हे पैसे आहे. तुम्ही पोस्टमन आहात. बेक्कार क्रेडिट घेऊ नका”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
“आपण बहिणीच्या घरी गेल्यावर तिला पैसे देतो, तेव्हा काय बस स्टँडवर बॅनर लावला का? आपण बहिणीला पैसे दिल्यावर कधी जाहिरात बाजी करत नाही. कारण आपल्याला नातं आणि नात्याची मर्यादा कळते. आपण बहिणीच्या गरीबीची थट्टा केली नाही. आणि हे मात्र बॅनर लावून बहिणींची थट्टा करत आहे. एकीकडे बहिणीला पैसे देता आणि स्नेहल जगताप सारख्या बहिणीवर टीका करता. एखादी बहीण तुम्हाला ऐकत नाही, तुम्हाला जाब विचारते तेव्हा तुमच्यातील पुरुष जागा होतो आणि तिच्या बाईपणावर टीका करता. हे संस्कार बाळासाहेबांचे नाही. आनंद दीघेंचे नाही. हे संस्कार तुमच्यावर रेशीम बागेतील बाटग्यांचे असू शकतात”, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
“उद्या परवा आचारसंहिता लागणार आहे. आमचा न्याय अजून झाला नाही. आता न्याय झाला तर काय कामाचा. ऑपरेशन इज सक्सेस बट पेशंट इज डेड अशी ही अवस्था आहे. रामदास फुटाणे यांची कविता ऐकवत सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला. मी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वाक्य ऐकण्यासाठी लोक आतूर आहेत. त्यामुळे ही मशाल पेटत ठेवा. धगधगती ठेवा”, असेही सुषमा अंधारेंनी म्हटले.