Captain Smit Machhar : थँक्यू कॅप्टन स्मित… मुंबईकरही अचंबित; इस्रायलने असं काय केलं?
भारतीय पायलट स्मित मच्छार यांनी दुबई-तेल अवीव फ्लाईदुबई विमानात 174 प्रवाशांचे जीव वाचवले. 35,000 फूट उंचीवर घडलेल्या थरारात त्यांनी अफाट धैर्य दाखवले. पंतप्रधान मोदी, ट्रम्प, नेतन्याहू यांनी त्यांचे कौतुक केले. इस्रायलने मुंबईत बिलबोर्ड लावून स्मित यांचा सन्मान केला. मुंबईचे रहिवासी असलेले स्मित दुखापतीतून सावरत आहेत.

भारताचा पायलट स्मित मच्छार यांनी दुबईवरून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाईदुबई फ्लाइटमधील 174 प्रवाशांचं आयुष्य वाचवलं. आकाशात 35,000 फूट उंचावर हा थरार घडला. पण स्मित यांनी हिंमत दाखवून या सर्वांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्मित यांचं कौतुक केलं आहे. या सर्वांनी स्मित हा खरा हिरो असल्याचं म्हटलं आहे. पण त्याहीपेक्षा संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटावी अशी कृती इस्रायलने केली आहे. इस्रायलने स्मित यांचा सन्मान म्हणून मुंबईत एक मोठा बिलबोर्ड लावला आहे. मुंबईतील इस्रायलच्या कॉन्स्युलेटने हा बोर्ड लावला आहे. भारतीयांसाठी ही प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे.
पायलट स्मित मच्छार हे मुंबईकर आहेत. चेंबूरचे रहिवाशी आहेत. त्यामुळे मुंबईत त्यांच्या सन्मानार्थ बोर्ड लावण्यात आले आहेत. मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्यदूत यानिव रेवाच यांनी स्मित यांच्या सन्मानार्थ शहरात एक विशेष बिलबोर्ड लावला आहे. फ्लाइदुबई हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला. ही फ्लाइट क्रॅश करण्याचा प्रयत्न होता. पण स्मित यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळेच त्यांचा गौरव म्हणून इस्रायलने हे बोर्ड लावले आहेत.
THANK YOU, CAPTAIN SMIT!
ISRAEL SALUTES YOU! https://t.co/meiAp4ylao— Yaniv Revach (@yanivrev) October 3, 2026
तोच खरा हिरो
इस्रायलचे महावाणिज्यदूत यानिव रेवाच यांनी एक्सवर बिलबोर्डचा फोटो शेअर केला आहे. त्यावर त्यांनी कमेंट केली आहे. भारताला नवीन हिरो मिळाला आहे. इस्रायल त्याचं नाव कधीच विसरणार नाही, असं रेवाच यांनी म्हटलं आहे. त्यांनी स्मित यांचे आभारही मानले आहेत. तसेच त्यांची प्रकृती ठिक व्हावी म्हणून प्रार्थनाही केली आहे. बिलबोर्डवर लिहिलंय, “Thank You Captain Smit for saving lives. We wish you a speedy recovery.” तसेच लोकांचा जीव वाचवणारा हिरो म्हणूनही त्यांचा गौरव केला आहे.
मोदी आणि ट्रम्पही म्हणाले, हिरो
स्मित यांच्या शौर्याचं जगभरात कौतुक होत आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचंही कौतुक केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ट्रम्प आणि नेतन्याहू यांनीही स्मित यांच्या शौर्याची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. तसेच त्यांना रिअल हिरोही म्हटलं आहे.
हात फ्रॅक्चर
स्मित मच्छार यांचे सासरे जयसुखभाई जोगी यांनी स्मित यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. देवानेच स्मितला वाचवलं. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना चांगलं वाटत आहे. ते त्यांच्या घरी आले आहेत. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी लोक येत आहेत. सर्व भेटत आहेत. चौकशी करत आहेत. आम्ही सर्व खूश आहोत. त्यांच्या हाताला मार लागला आहे. हाताला फ्रॅक्चर झाला आहे. शरीरावर अनेक ठिकाणी टाके पडले आहेत. पण त्यांची प्रकृती स्थिर आहे. देवानेच त्यांना वाचवलं आहे, असं जयसुखभाई जोगी म्हणाले.