शिवसेना फोडल्याने महाराष्ट्र बाणा कमजोर, भाजपचे मिशन पूर्ण; ‘सामना’तून हल्लाबोल

| Updated on: Jan 11, 2023 | 8:17 AM

भाजपने त्यांचे मिशन पूर्ण केले. त्यासाठी महाराष्ट्राच्या अखंडतेचा आणि स्वाभिमानाचा बळी दिला. शिवसेना फुटल्यानंतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई महाराष्ट्रात घुसले.

शिवसेना फोडल्याने महाराष्ट्र बाणा कमजोर, भाजपचे मिशन पूर्ण; सामनातून हल्लाबोल
शिवसेना फोडल्याने महाराष्ट्र बाणा कमजोर, भाजपचे मिशन पूर्ण; 'सामना'तून हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: भाजप नेते गिरीश महाजन यांनी राज्यातील सत्तांतराचं मिशन कसं पूर्ण केलं यावर दोन दिवसांपूर्वीच जाहीर भाष्य केलं होतं. महाजन यांच्या या भाषणाचा संदर्भ देत ठाकरे गटाने दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. शिवसेना फोडल्याने महाराष्ट्र बाणा कमजोर होण्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाजपचं मिशन पूर्ण झालं आहे, असा दावा सामनातून करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री अहोरात्र काय दिवे लावतात? असा सवालही अग्रलेखातून करण्यात आला आहे.

गिरीश महाजन यांच्या विधानातून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. शिवसेनेतून जे 40 आमदार फुटले ते कोणत्याही उदात्त हेतूने फुटले नाहीत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर फुटले नाहीत. शिवसेना राष्ट्रवादीमुळे फुटली नाही. शरद पवार यांनी कारस्थान केल्यामुळे शिवसेना फुटल्याचा शिंदे गटाच्या आमदारांचा दावाही महाजन यांच्या विधानाने फोल ठरला आहे.

हे सुद्धा वाचा

हे सर्वच्या सर्व चाळीस आमदार स्वत: विक्रीसाठी बाजारात उभे होते. त्यांची बोली लावल्या गेली आणि ते फुटले असं सांगतानाच दाम देऊन हे आमदार फुटल्याचं महाजन यांच्या विधानातून स्पष्ट झाल्याचं अग्रलेखातून म्हटलं आहे.

शिंदे गट बऱ्याच काळापासून फुटण्याच्या तयारीत होता. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाची संधी साधली आणि फुटले. त्यानंतर भाजपने सर्व ठरल्याप्रमाणे केले. शिवसेना फोडायची हे भाजपने ठरवलेलेच होते. त्यानुसार त्यांनी सापळा रचला होता, असा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्यासाठी शिवसेना फोडायची होती. त्यानुसार शिवसेना फोडली गेली आहे. सर्व व्यवहार, देणेघेणे वगैरे पक्के झाल्यावरच फुटीचा दिवस ठरला. शिवसेना फुटल्यावर देवेंद्र फडणवीस आणि भाजपने हातवर केले होते. पण महाजन यांनीच या सर्वांना तोंडघशी पाडल्याचा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे.

भाजपने त्यांचे मिशन पूर्ण केले. त्यासाठी महाराष्ट्राच्या अखंडतेचा आणि स्वाभिमानाचा बळी दिला. शिवसेना फुटल्यानंतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई महाराष्ट्रात घुसले आणि त्यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा केला.

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले गेले. राज ठाकरेंसारखे नेते दोन चार उद्योग गेल्याने काय बिघडले? अशी भाषा करू लागले. शिवसेना फोडल्याने महाराष्ट्र बाणा कमजोर झाल्याची सुरुवात झाली, असा दावाही करण्यात आला आहे.

महाजन यांना मुख्यमंत्र्यांच्या झोपेची चिंता आहे. पण अहोरात्र जागून मुख्यमंत्री काय दिवे लावतात? डोळे सताड उघडे असतानाच महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातने पळवून नेली त्याचं काय? असा चिमटाही काढण्यात आला आहे.