जमावाच्या मारहाणीत चोराचा मृत्यू

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

मुंबई : वसईत चोरी करण्यासाठी गेलेल्या चोराला जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत चोराचा मृत्यू झाला. वसई पूर्वेकडील मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ आशा नगर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. नसीम जमील शेख असे त्या चोरट्याचे नाव आहे. तो 38 वर्षांचा होता. नसीम जमील शेख हा नालासोपारा पूर्वेकडील […]

जमावाच्या मारहाणीत चोराचा मृत्यू
Follow us on

मुंबई : वसईत चोरी करण्यासाठी गेलेल्या चोराला जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत चोराचा मृत्यू झाला. वसई पूर्वेकडील मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ आशा नगर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

नसीम जमील शेख असे त्या चोरट्याचे नाव आहे. तो 38 वर्षांचा होता. नसीम जमील शेख हा नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर परिसरात राहत होता. तो व्यवसायाने रिक्षाचालक होता. गेल्या रविवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास वसई पूर्वेकडील आशा नगर परिसरात नसीम जमील शेख चोरी करण्यासाठी गेला. तिथे एका घरात शिरल्यावर परिसरातील लोकांनी त्याला पकडलं. त्यानंतर संतप्त जमावाने त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या हातावर, पाठीवर, पोटावर लोखंडी सळई, लाकूड, केबलची वायर, चामडयाच्या पट्याने मारहाण करण्यात आली. या जबर मारहाणीत नसीम जमील शेख गंभीर जखमी झाला.

जखमी अवस्थेत तो पुढे महामार्गाजवळच्या एका झोपडीत जाऊन पडला. मात्र, काहीवेळाने त्याचं झोपडीत त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना ही घटना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नसीम जमील शेखला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मृतदेहाच शवविच्छेदन करण्यात आलं. त्यात मारहाणीमुळे नसीम जमील शेखचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.

या प्रकरणी वालीव पोलिसांना मारहाणीचा एक व्हिडीओ मिळाला होता. त्या व्हिडीओआधारे पोलिसांनी दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तर एक जण फरार आहे. पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्यांनीच संतप्त जमावाचा फायदा घेत नसीम जमील शेखला जबर मारहाण केल्याचं उघड झालं. मारहाणीत मृत्यू झालेला नसीम जमील शेख हा सराईत चोर असून यापूर्वी त्याने तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याच उघडं झालं. तसेच तो वसईच्या आशा नगर परिसरातही चोरीच्या उद्धेष्याने गेला असल्याचं उघड झालं आहे. मात्र, नसीम जमील शेख हा चोर जरी असला तरी त्याचा जीव घेण्याचा अधिकार कुणालाही नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच, नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहनही पोलिसांनी केलं.