
बारामतीच्या निवडणुकीचे सर्व ईव्हीएम पुण्यात ज्या स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले. तिथं तब्बल 45 मिनिटं सीसीटीव्ही फुटेज बंद असल्याचा आरोप शरद पवार गटानं केला. शरद पवार गटाचे निवडणूक अधिकारी लक्ष्मीकांत खाबिया यांनी बंद पडलेल्या सीसीटीव्हीचं फुटेज सोशल मीडियात पोस्ट केलं आणि खळबळ उडाली.
तक्रारीनंतर 45 मिनिटांनी मॉनिटरवर सीसीटीव्ही फुटेज पुन्हा एकदा दिसायला लागलं. पण या 45 मिनिटांमध्ये काय घडलं ? असा सवाल शरद पवार गटाचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी केला. तर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण देताना म्हटलंय की, इलेक्ट्रिशियन कडून एक वायर निघाल्यानं फक्त मॉनिटरवर दिसत नव्हतं. पण सीसीटीव्ही सुरुच होते आणि त्या 45 मिनिटांचं फुटेजही रेकॉर्ड झालेलं आहे.
बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना आहे. आता सीसीटीव्ही फुटेज 45 मिनिटं बंद झाल्यानं सुप्रिया सुळेंनीही संताप व्यक्त केला. बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या ईव्हीएम ज्या गोडावूनमध्ये ठेवल्या आहेत. तिथले सीसीटीव्ही सकाळी 45 मिनिटे बंद पडले होते. ईव्हीएम सारखी अतिशय महत्वाची गोष्ट जिथं ठेवलेली आहे, तेथील सीसीटीव्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे. तसंच हा खूप मोठा हलगर्जीपणा देखील आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधींना इव्हीएमच्या स्थितीची पाहणी देखील करु दिली जात नाही. हे अतिशय गंभीर आहे.
जसं बारामतीत झालं त्याच प्रकारची घटना एक दिवसआधी साताऱ्यात झाली. साताऱ्यातही ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात आल्या तिथलं सीसीटीव्ही फुटेज बंद झाल्याची तक्रार शरद पवार गटाकडून करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही सीसीटीव्ही फुटेजच्या पुरवठादारांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. तोपर्यंत मतदानानंतर EVM मशीन स्टाँग रुममध्ये सुरक्षित ठेवल्या जातात. कुठलीही छेडछाड होऊ नये म्हणून 24 तास सीसीटीव्हीची निगराणी असते. पण स्टाँग रुममधलंच फुटेज दिसणं बंद झाल्यानं, बारामती आणि साताऱ्यात शरद पवार गटानं शंका घेतलीय.