चीनमधील जीवघेणा कोरोना विषाणू मुंबईत दाखल, दोन संशयित रुग्ण आढळले

| Updated on: Jan 24, 2020 | 10:20 PM

चीनवरुन परतलेल्या दोन जणांना कोरोना वायरसची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे (Corona Virus). या दोन्ही रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

चीनमधील जीवघेणा कोरोना विषाणू मुंबईत दाखल, दोन संशयित रुग्ण आढळले
Follow us on

मुंबई : चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूने आता भारतात प्रवेश केला आहे. कोरोना विषाणू थेट मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईमध्ये कोरोना विषाणूचे दोन संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ (Corona Virus) उडाली आहे. चीनमध्ये या विषाणूने आतापर्यंत तब्बल 26 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे जगभरात या विषाणूची धास्ती आहे. हाच विषाणू मुंबईत दाखल झाल्याने भीती व्यक्त होत आहे. या दोन्ही रुग्णांना सध्या मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत (Corona Virus). कोरोना विषाणूने आतापर्यंत चीनमधील 26 जणांचा बळी घेतला आहे. तर 830 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. यामुळे वुहानसह 9 शहरं बंद ठेवण्यात आली आहेत. महत्त्वाचं म्हणजे याच वुहानमध्ये 700 हून अधिक भारतीय विद्यार्थी शिकत आहेत.

दरम्यान, चीनवरुन मुंबईत परतलेल्या दोन जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे (Corona Virus). या दोन्ही रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, दोन्ही रुग्णांना हलका सर्दी-खोकल्याचे लक्षणं आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत सध्या कुठलीही माहिती उघड करण्यात आलेली नाही.

कोरोना विषाणूबाबत दक्षता घेत मुंबई महापालिकेने  चिंचपोकळीच्या कस्तुरबा रुग्णालयाला यबाबत काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यावरुन कस्तुरबा रुग्णालयात कोरोना विषाणूचती लागण झालेल्या रुग्णांसाठी वेगळा वॉर्ड तयार करण्यात आला आहे, जेणेकरुन त्यांना इतर रुग्णांपासून दूर ठेवता यावं.

सरकारच्या निर्देशानुसार, भारतात 18 जानेवारीपासून  देशभरातील सात विमानतळांवर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी/स्क्रिनिंग करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मुंबईतही चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत 1,739 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. यातील सहा प्रवाशी हे महाराष्ट्रातील आहेत. यात तीन पुणे, तीन प्रवासी मुंबईतील आहेत.

दिल्ली, मुंबई, कोलकाता विमानतळावर चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. चीनमध्ये सध्या या कोरोना विषाणूची दहशत आहे. अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे तर आतापर्यंत या विषाणूने 26 जणांचा बळी घेतला आहे. थायलंड, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

कोरोना विषाणूची लक्षणं

कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्यांचं वय सरासरी 73 वर्ष आहे. मृतांमध्ये सर्वाधिक वयाची व्यक्ती 89 वर्षांची होती, तर सर्वात कमी वयाची व्यक्ती 48 वर्षांची होती.

नाक गळणं, खोकला, घसा खवखवणे, डोके दुखी आणि ताप ही कोरोना विषाणूची लक्षण आहेत. कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना या विषाणूची लागण लवकर होते. वयस्कर आणि लहान मुलांना या विषाणूची लागण सहज होते. निमोनिया, फुफ्फुसांमध्ये सूज, शिंका येणे, दमा इत्यादीही या विषाणूची लक्षणं असू शकतात.

विषाणूपासून बचावाचे उपाय

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी, कमी करण्यासाठी काही खबरदारी घेण्यास सांगितले आहे. संयुक्त राष्ट्राने ट्वीट करत यापासून बचावाचे उपाय सांगितले आहेत.

ट्वीट नुसार,

1. हात साबणाने स्वच्छ धुवावे.
2. खोकताना किंवा शिंकताना नाकावर आणि तोडांवर रुमाल ठेवावा.
3. ज्यांना सर्दी किंवा तापाची लक्षणं असतील त्यांनी गर्दीत जाणे टाळावं.
4. मांस आणि अंडी नीट शिजवून घ्यावी.
5. जंगल किंवा शेतात काम करणारे, राहणाऱ्यांनी जनावरांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.

कोरोना विषाणूवर उपचार

कोरोना विषाणूचा अद्याप कुठलाही उपचार किंवा निदान सापडलेलं नाही. कोरोना विषाणूवर अद्याप कुठलीही वॅक्सीन उपलब्ध नाही. यापासून बचावाचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे काळजी घेणे. कुठल्याही आजारी व्यक्ती, सर्दी, निमोनियाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळा. मास्क घाला. डोळे, नाक आणि तोडांला स्पर्श करणे टाळा. नेहमी हात स्वच्छ धुवा.