Uddhav Thackeray : ट्रम्प टॅरिफवरुन उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला घेरले, भारत केवळ पाकिस्तानला…

Trump Reciprocal Tariff: आपण पाकिस्तानला इशारा देऊ शकतो. चीनला इशारा देऊ शकत नाही. अमेरिकेला तर नाहीच नाही. मग आता जे सुरू आहे ते भोगत बसायचे आहे. हे आपल्याला कळू द्यायचे नाही यासाठी कुठे तरी वेगळे विषय काढायचे आहे.

Uddhav Thackeray : ट्रम्प टॅरिफवरुन उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला घेरले, भारत केवळ पाकिस्तानला...
uddhav thackeray
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 03, 2025 | 1:45 PM

UddhavThackeray On Trump Reciprocal Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 27 टक्के टॅरिफ लावले. त्यावरुन आता देशात वेगवगेळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहे. भारताने अमेरिकेला 52 टक्के टॅरिफ लावले आहे. ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याचा इशारा यापूर्वीच दिला होता. परंतु ट्रम्प यांनी 27 टक्के टॅरिफ लावून भारताला काहीसा दिलासा दिला. या विषयावरुन शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला घेरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विश्वासात घेतले नाही, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे गुरुवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले, साधारण दीड महिन्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांना इशारा दिला होता. ट्रम्प म्हणाले होते, भारताने कर कमी करावे नाही तर आम्ही जशास तसे कर भारतावर लावू. ते ट्रम्प यांनी करुन दाखवले. त्यानंतर शेअर बाजारात पडझड सुरु झाली. खरंतर हा विषय देशाच्या ताठकण्याचा होता. परंतु आता देशावर आर्थिक संकट कोसळेल की काय? देशाचा पाठकणा मोडेल की काय? ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

देशात आर्थिक संकटाची परिस्थिती असताना पंतप्रधान, अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांनी देशाला विश्वासात घ्यायला हवे होते. सर्व विषय बाजूला ठेवून यावरु चर्चा करायला हवी होती. अमेरिकन टॅरिफचे दुष्परिणाम काय होईल त्याचा विचार करायला हवा होता. टॅरिफच्या संकटाबाबत मोदी यांनी देशाला विश्वासात घेतले असते तर आर्थिक फटका कमी करता आला असता. मग आम्ही एकमुखाने एका क्षणाचाही विचार न करता मोदी सरकारला पाठिंबा दिला असता. पण तसे झालं नाही. पण त्याकडे दुर्लक्ष झाले, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

पाकिस्तानबाबत  उद्धव ठाकरे म्हणाले…

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आपण पाकिस्तानला इशारा देऊ शकतो. चीनला इशारा देऊ शकत नाही. अमेरिकेला तर नाहीच नाही. मग आता जे सुरू आहे ते भोगत बसायचे आहे. हे आपल्याला कळू द्यायचे नाही यासाठी कुठे तरी वेगळे विषय काढायचे आहे. आजतरी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेत सर्व विषय बाजूला ठेवून या विषयावर चर्चा करावी. पंतप्रधान परदेशात गेले. अर्थमंत्री कुठे माहीत नाही. परराष्ट्र मंत्रीही नाही. या सर्वांनी शासकीय भाषेत देशाला अवगत केले पाहिजे. या संकटावर बोलले पाहिजे, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी केली.