
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेनेने रणशिंग फुंकले आहे. अजून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तारखा जाहीर व्हायच्या आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या निवडणुका अगदी काही महिन्यातच होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रानंतर आता भाजपाचे मिशन मुंबई आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेतील सत्ता हातातून जाऊ द्यायची नाही यासाठी ठाकरे गटाने मास्टरप्लॅन तयार केला आहे. आता लढा आपल्या मुंबईचा या टॅगलाईन खाली शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे. काय आहे ठाकरेंची रणनीती?
ठाकरे गट-मनसे युती
सध्या मुंबईतच नाही तर राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रिकरणाची चर्चा रंगली आहे. दोन्ही पक्षांकडून याबाबत सकारात्मक संदेश येत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आता थेट बातमीच देणार असल्याचे म्हटले आहे. आता हे दोन्ही ठाकरे एकाच मंचावर कधी येतात याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. दो्न्ही ठाकरे एकत्र आल्यास मराठी, मराठी माणूस हा मुद्दा पालिका निवडणुकीच्या अजेंड्यावर राहील. या मुद्दाभोवतीच ही निवडणूक फिरेल.
‘लढा आपल्या मुंबईचा’
स्थानिक मुद्यांसह मराठी अस्मितेवर शिवसेनेचा जोर असेल. ‘लढा आपल्या मुंबईचा’ या माध्यमातून ठाकरे गटाची मुंबई महानगर पालिकेची रणनीती ठरली आहे. मुलुंड येथे ठाकरे गटाचा मेळावा पार पडल्यानंतर 1 ऑगस्ट रोजी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
आगामी मुंबई महानगर पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लढा आपल्या मुंबईचा माध्यमातून ठाकरे गटाच्या वतीने मुंबईत 10 जून ते 1 ऑगस्टपर्यत मुंबईतील विविध भागात आंदोलन करण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड येथील कालिदास सभागृहात मेळावा पार पडल्यानंतर मुंबईतील पदाधिकार्यांना मुंबई महानगर पालिकेच्या दृष्टीने विविध कार्यक्रम घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अदानीविरोधात पहिला घंटानाद
लढा आपल्या मुंबईचा माध्यमातून ‘अदानीला घालवूया, मुंबईच्या अस्मितेसाठी लढूया’ या मोहिमेला ठाकरे गटाच्या वतीने आजपासून सुरवात होत आहे. ठाकरे गटाच्या वतीने लढा आपल्या मुंबईचा या माध्यमातून घेण्यात येणार्या आंदोलनाची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. 10 जून ते 13 जूनपर्यंत लढा आपल्या मुंबईचा या माध्यमातून अदानीच्या विरोधात वार्ड अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
14 – जून रोजी मुंबईच्या लढ्याविषयी मुंबईतील प्रत्येक घराघरात परिपत्रक वाटप
15 जून – आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विधानसभेतील शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे
22 जून – शाखानिहाय मुख्य चौकात फलकबाजी आणि बैठका घेणे
29 जून – शाखानिहाय राष्ट्रपती यांना अदानी यांच्या विरोधात पोस्ट कार्ड पाठवणे…
6 जुलै – आषाढी एकादशी निमित्त महिला दिंडीचे आयोजन करून अदानीला विरोध करणे
13 जुलै – खासदार आणि आमदार यांच्या उपस्थितीत विधानसभानिहाय सामाजिक संस्था, वरिष्ठ नागरीक यांच्या बैठका घेणे
20 जुलै – 1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबतीत नागरिकांना माहिती देणे आणि पत्रक वाटप
27 जुलै – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने मॅरेथॉनचे आयोजन
28 जुलै – महाआरतीचे आयोजन
29 जुलै – शाखानिहाय मुख्य चौकात अदानीच्या विरोधात फलकबाजी आणि बैठक
1 ऑगस्ट – आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढा आपल्या मुंबईचा या माध्यमातून महामोर्चाचे आयोजन