मणिपूर पुन्हा अशांत! पाच जिल्ह्यांत इंटरनेट बंद, या कारणामुळे हिंसेचे लोण पसरले
Manipur Violence : मणिपूरमधील आग काही शांत होताना दिसत नाही. गेल्या काही वर्षांपासून मणिपूर सारखं धुमसत आहे. आता ताज्या हिंसाचारानंतर पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

मणिपूरमध्ये (Manipur) पु्न्हा एकदा तणाव वाढला आहे. मणिपूर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने धुमसत आहे. येथील तणाव निवाळण्याची चिन्ह दिसत नाही. राज्यातील पाच जिल्हे इंफाल पश्चिम, इंफाल पूर्व, थौबल, बिष्णूपूर आणि ककचिंगमध्ये इंटरनेट आणि मोबाईल सेवा पाच दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. मैतई समाजाचे नेते अरामबाई तेंगगोल (Maitai Leader Arrest) यांच्या अटकेनंतर लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अनेक ठिकाणी तीव्र प्रदर्शन केले. काही ठिकाणी जमाव हिंसक झाला.
असामाजिक तत्त्वांचा मोठा डाव
अरामबाई यांच्या अटकेच्या आडून काही असामाजिक तत्त्वे समाज माध्यमांचा वापर करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रक्षोभक संदेश, चित्रे आणि व्हिडिओ प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे शांतता प्रक्रियेला गालबोट लागण्याची शक्यता आहे. गृह विभागाचे सचिव एन. अशोक म्हणाले की या घटनांमुळे कोणतीही पूर्वसूचना न देता आपत्कालीन परिस्थितीत इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे असामाजिक तत्त्वे त्यांचा अजेंडा राबवू शकणार नाहीत. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
आता हिसेंचे लोण पाच जिल्ह्यात
शनिवारी रात्री उशीरा मणिपूर पोलिसांनी अरामबाई तेंगगोल यांना अटक केली. अनेक लोक त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले. क्वाकईथेल आणि युरिपोक परिसरात लोकांनी रस्त्यावर टायर आणि जुने फर्निचर जाळून विरोध प्रदर्शन केले. त्यांनी अरामबाई यांना सोडण्याची जोरदार मागणी केली. काही ठिकाणी सुरक्षा यंत्रणा आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येत आहे. तर प्रशासनाने या जिल्ह्यात अतिरिक्त सुरक्षा दलांना पाचारण केले आहे. या नेत्याची अटक का करण्यात आली. त्याच्यावर काय आरोप आहेत, हे समोर आलेले नाही.
दोन वर्षांपासून मणिपूर अशांत
मणिपूर 3 मे 2023 पासून अशांत आहे. मैतई बहुल आणि कुकी बहुल परिसरात हिंसा झाली. तेव्हापासून हे दोन्ही समाज एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यातून त्यांच्यात हिंसा झाली आहे. कुकी समाजाला सध्या राज्यात अनसूचीत जमातीचा (ST) दर्जा देण्यात आला आहे. मैतेई समाज सुद्धा अनुसूचीत जमातीचा दर्जा देण्याची मागणी करत आहे. तर कुकी समाजाने मैतईंच्या या मागणीला कडाडून विरोध केला आहे. तेव्हापासून दोन्ही समाजात सातत्याने हिंसक घटना घडत आहेत. 9 मे रोजी मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागू आहे.
