
चेंबूर येथील मैत्री पार्क येथे बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेत सदरुद्दीन खान यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक असलेल्या सदरुद्दीन खान यांच्याकार वर अज्ञातांनी जवळून गोळीबार केल्याची घटना चेंबुर येथील मैत्री पार्क येथे घडली आहे. या घटनेत सदरुद्दीन खान (५० ) यांच्यावर ४-५ गोळ्या अज्ञात इसमाकडून झाडण्यात आल्या आहेत. रात्री ९:३० च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली आहे.
सायन – पनवेल महामार्गावरून सदरुद्दीन खान नवीमुंबईला जात असताना डायमंड सिंगल येथे त्यांच्या गोळीबार झाला आहे. गोळीबार करणारे दोन हल्लेखोर बाईकवरुन आले होते. त्यांनी जवळून गोळीबार करुन ते पसार झाले आहेत. आरोपींच्या शोधासाठी पाच पथके स्थापन करण्यात केली आहेत असे पोलीसांनी सांगितले आहे. गोळीबारानंतर एका लेनची वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्यामुळे येथे एरव्ही देखील प्रचंड ट्रॅफीक असते. या घटनेने येथे घबराट पसरून आणखीन गोंधळ उडाला. संपूर्ण सायन ते पनवेल महार्गावरील ट्रॅफीक त्यामुळे जाम झाले आहे. फोरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.
चेंबूर येथील डायमंड गार्डन ते मैत्री पार्क परिवार या दरम्यान रस्त्यावर ही घटना घडली आहे. सदरुद्दीन खान यांच्यावर सध्या चेंबूर मधील झेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दोन अज्ञात आरोपींनी मोटार सायकलीवरुन येऊन बांधकाम व्यावसायिकावर जवळून गोळीबार केला आहे. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. पोलीस उपायुक्त ढवळे येथे दाखल झाले असून स्थानिक परिसरात येथे सीसीटीव्हींचे जाळे असल्याने त्याचा आधार घेऊन आरोपींचा शोध सुरु झाला आहे.