रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे निधन, द कम्प्लिट मॅन काळाच्या पडद्याआड

रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि पद्मभूषण विजेते विजयपत सिंघानिया यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे निधन, द कम्प्लिट मॅन काळाच्या पडद्याआड
raymond chairman vijaypat singhania
| Updated on: Mar 29, 2026 | 8:19 AM

भारतीय वस्त्रोद्योगाला जागतिक नकाशावर नेणारे आणि रेमंड ब्रँडला घराघरात पोहोचवणारे पद्मभूषण विजयपत सिंघानिया यांचे मुंबईत निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे केवळ उद्योग जगतच नव्हे, तर साहसी क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील एका पर्वाचा अंत झाला आहे. रेमंड ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष आणि त्यांचे चिरंजीव गौतम सिंघानिया यांनी एक्स (ट्विटर) वर यासंदर्भात माहिती देत आपल्या वडिलांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

रेमंडला जागतिक ओळख दिली

१९३० च्या उत्तरार्धात जन्मलेल्या विजयपत सिंघानिया यांनी १९८० च्या दशकात रेमंड ग्रुपची धुरा सांभाळली. २००० सालापर्यंत ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी रेमंडला केवळ कापड बनवणारी कंपनी न ठेवता, तिला ‘द कम्प्लीट मॅन’ या टॅगलाईनसह एक प्रीमियम लाइफस्टाइल ब्रँड बनवले. त्यांच्या व्यावसायिक दूरदृष्टीमुळे भारतीय कापड उद्योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळाला.

विजयपत सिंघानिया केवळ बोर्डरूममध्येच मर्यादित नव्हते, तर त्यांना आकाशाची ओढ होती. ते एक उत्कृष्ट प्रशिक्षित वैमानिक होते. २००५ मध्ये त्यांनी हॉट एअर बलूनमधून (Hot Air Balloon) तब्बल २१,००० मीटरपेक्षा जास्त उंची गाठून जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. त्यावेळी त्यांचे वय ६७ वर्षे होते. विमानचालन क्षेत्रातील त्यांच्या याच अतुलनीय योगदानाची दखल घेऊन भारतीय हवाई दलाने त्यांना १९९४ मध्ये मानद एअर कमोडोर ही पदवी देऊन गौरविले होते.

पुरस्कार आणि सामाजिक कार्य

देशाच्या औद्योगिक आणि साहसी क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय त्यांनी मुंबईचे शेरीफ म्हणूनही कार्यभार सांभाळला होता. ते एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. ज्यांनी अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांना सढळ हस्ते मदत केली.

कौटुंबिक चढ-उतार

विजयपत सिंघानिया यांनी आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात आपला संपूर्ण ३७ टक्के हिस्सा मुलगा गौतम यांच्या नावावर केला होता. त्यानंतर वडील आणि मुलामध्ये मालमत्तेवरून कायदेशीर वाद निर्माण झाला होता, ज्यामुळे ते काही काळ चर्चेत राहिले होते. मात्र, नंतर त्यांनी हे वाद सामोपचाराने मिटवले होते.

सिंघानिया यांच्या कुटुंबियांच्या माहितीनुसार, आज २९ मार्च २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता मुंबईतील मलबार हिल येथील हवेली निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी ३.०० वाजता गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

Follow Us