अजितदादा भाजपसोबत जाण्याची चर्चा जपानपर्यंत गेली, कशी?; काय होती नरहरी झिरवळ यांची पहिली प्रतिक्रिया?

| Updated on: Apr 23, 2023 | 2:39 PM

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ जपान दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. जपान दौऱ्यावरच असताना त्यांना राज्यातील घडामोडींची माहिती मिळाली.

अजितदादा भाजपसोबत जाण्याची चर्चा जपानपर्यंत गेली, कशी?; काय होती नरहरी झिरवळ यांची पहिली प्रतिक्रिया?
narhari zirwal
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या 15 दिवसांपासून राज्यात सुरू आहेत. अजितदादा पवार मध्ये एक दिवस नॉट रिचेबल होते. त्यामुळे या चर्चा सुरू झाल्या. ही चर्चा थांबते न थांबते तोच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचं ट्विट केलं होतं. त्यामुळे अजितदादा भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. नंतर तर अजितदादांकडे 40 आमदार असल्याचा दावाही केला जाऊ लागला. या घडामोडी सुरू असताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि काही आमदार जपानला गेले होते. अजितदादा भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा थेट जपानपर्यंत पोहोचली होती. त्याची माहिती खुद्द नरहरी झिरवळ यांनी दिली आहे.

विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना ही माहिती दिली. आम्ही जपान दौऱ्यावर होतो. तेव्हा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दौरा अर्धवट टाकून भारतात यायला निघाले होते. महाराष्ट्रात खूप राजकीय उलथापालथ सुरू असल्याचं आम्ही ऐकून होतो. आमच्यासोबत भागवत साहेब होते. भागवत म्हणाले, साहेब काही झालं तरी शेवटी मला फोन येईलच. आपल्याला समजेलच. त्यामुळे काही तसं धास्ती करायचं काम नाही, असं नरहरी झिरवळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा

विधानसभा अध्यक्ष म्हणाले, मला जावं लागेल

विधानसभा अध्यक्षांना त्यांच्या मतदारसंघात काही कार्यक्रम होते म्हणून भारतात जायचं होतं. मला जावं लागेल, असं ते म्हणाले. त्यामुळे आमचा काही संशयही नव्हता. पण चर्चा असेल इकडे. आज आल्यावर इथे काही उलटंपालटं सुरू आहे असं जाणवत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

हे आमचं भाग्य

आंबेडकर जयंतीच्या दिवशी झिरवळ ओसाकाला होते. यावेळी ओसाकातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करता आलं हे आमचं भाग्य असल्याचं ते म्हणाले. हा प्रसंग सांगताना झिरवळ यांचा कंठ दाटून आला होता. ओसाका येथे 7 ते 8 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवलेला आहे. 14 एप्रिलला जयंतीच्या दिवशी आम्ही तिथे होतो. आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. इथे आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करतोच. पण परदेशात जाऊन महामानवाला अभिवादन करण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य आहे. खरी किंमत माणसाची त्यावेळी कळते. इथेच नाही तर संपूर्ण जगात बाबासाहेबांचं नाव आहे. हा अनुभव वेगळं समाधान देणारा होता, असं ते म्हणाले.