लग्नाला नकार दिल्याने संतापला, नराधमाचा तरूणीवर कोयत्याने हल्ला
आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहासमोर ही घटना घडली असून या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हल्ला केल्यावर नराधम आरोपी फरा झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

पुण्यातील जुन्नर येथून एक अतिशय हादरवणारी घटना समोर आली आहे. शहरातील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर एका तरूणाने कोयत्याने हल्ला केला. यामध्ये ती जखमी झाली असून तिच्यावर जुन्नर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महेश मुरलीधर डामसे असे आरोपीचे नाव असल्याचे समजते. हल्ला केल्यावर तो आरोपी फरार झाला असून जुन्नर पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.
अचानक केला हल्ला
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जिच्यावर हल्ला झाला ती पीडित विद्यार्थिनी गौरी संजय साळवे (वय – 18) ही जुन्नर येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात होती. गौरी आणि आरोपी महेश हे दोघे एकाच गावत असल्याचे समजते. घटनेच्या दिवशी गौरी ही विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे सकाळी वसतिगृहातून बाहेर पडली. मात्र तेवढ्यात आरोपी महेश हा तिच्यासमोर आला आणि क्षणातच त्याने तिच्यावर धारदार कोयत्याने सपासप वार करत तिच्यावर हल्ला केला. त्याने तिच्या मानेवर तसेच चेहऱ्यावर वार केल्याची माहिती समोर आली आहे.
अचानक तो समोर आल्याने गौरी भांबावली, आणि हल्ला केल्यावर ती रक्तबंबाळ अवस्थेत जखमी होऊन धाडकन खाली पडली. तिच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी महेश मुरलीधर डामसे हा लागलीच तेथून पळाला आणि फरार झाला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गौरी कोसळल्याचे दिसताच वसतीगृहातील विद्यार्थिनी, इतर लोकं हादरलेच. मात्र त्यांच्यापैकी काही जणांनी प्रसंगावधान दाखवत तिच्या मदतीसाठी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने गौरी हिला उपचारासाठी जुन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
एकाच गावात रहायचे दोघे
मिळालेल्या माहितीनुसार, गौरी आणि आरोपी महेश हे दोघे एकाच गावातील रहिवासी आहेत. महेशने तिला लग्नासाठी विचारलं होतं, मात्र गौरीने त्याला नकार दिला होता. याच गोष्टीचा राग आरोपीच्या मनात होता. घटनेच्या दिवशी ती सकाळी बाहेर पडल्यावर थोडं अंतर पुढे चालून गेली, तेव्हा सरकारी दवाखान्याच्या मागच्या बाजूस महेश समोर आला आणि त्याने तिला अडवलं.
लग्नाला नकार दिला याच कारणावरून संतापलेल्या महेशने तिच्यावर अचानक कोयत्याने हल्ला केला. लग्नासाठी मी नकार दिला त्याचाच राग मनात धरून आरोपीने आपल्यावर हल्ला केला, असा जबाब जखमी विद्यार्थिनीने पोलिसांना दिला आहे. जुन्नर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून फरार आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
