भाजप जिथं शक्तिशाली मित्रपक्षांना तिच जागा हवी… विधान परिषद निवडणुकीत पेच वाढला, शिंदे सेना आणि राष्ट्रवादीला किती हव्यात जागा?

Mahayuti on local body elections of the Legislative Council: विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. आता जागा वाटपावरून महायुतीमध्येच रस्सीखेच सुरू झाली आहे. महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्याच्या हालचाली सुरू असतानाच भाजपकडे मित्रपक्षांनी इतक्या जागांची मागणी केली आहे.

भाजप जिथं शक्तिशाली मित्रपक्षांना तिच जागा हवी... विधान परिषद निवडणुकीत पेच वाढला, शिंदे सेना आणि राष्ट्रवादीला किती हव्यात जागा?
महायुती, विधान परिषद निवडणूक, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 21, 2026 | 2:30 PM

Eknath Shinde Shivena- Ajit Pawar NCP on BJP: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला आहे. जागा वाटपाचे सूत्र ठरत असतानाच त्यावरूनच महायुतीत वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण जिथे भाजपचे संख्याबळ अधिक आहे, तिथेच मित्रपक्षांनी जागांवर दावा सांगितल्याने पेच निर्माण झाला आहे. विधान परिषद निवडणुकीबाबत नवीन माहिती समोर आली आहे. भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मोक्याच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे.

शिंदे सेना आणि दादांच्या राष्ट्रवादीला हव्यात इतक्या जागा

विधानपरिषद निवडणूकीबाबत नवीन माहिती समोर आली आहे. त्यानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपकडे ७ जागांची मागणी केली आहे. तर दादांच्या राष्ट्रवादीने भाजपकडे ३ जागांची मागणी केली आहे. म्हणजे एकूण १७ जागांपैकी १० जगांवर मित्रपक्षांनी दावा केला आहे. तर मोठा भाऊ असूनही भाजपकडे अवघ्या ७ जागा हाती लागत आहेत. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.

ठाणे आणि पुणे भाजप सोडणार?

जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवताना ठाणे आणि पुणे हा कळीचा मुद्दा ठरत आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपचे संख्याबळ आहे. तर इथं मित्रपक्षांनी दावा ठोकला आहे. ⁠ठाण्याची जागा एकनाथ शिंदे यांना पाहिजे पण तिथे भाजपचे संख्याबळ जास्त आहे. पुण्याची जागा सुनेत्रा पवार यांना पाहिजे पण तिथे भाजपचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे ठाणे आणि पुणे भाजप सोडणार का? यावर खल सुरू आहे. ⁠ठाणे आणि पुणे सोडली तर बदल्यात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जास्तीच्या जागा पदरात पाडून घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार?

ठाणे आणि पुण्यासह राज्यातील काही जागांवर महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा सोडणार नसल्याचा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.  या जागांसाठी तीनही पक्ष आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे भाजपपुढे पेच वाढला आहे. जर जागा वाटपात तडजोड झाली नाही तर महायुतीत अंतर्गत वाद होण्याचीही दाट शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीत दिलजमाई झाली नाही तर विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार अटळ असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी दोन दिवसांपुर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली तर ⁠काल सुनेत्रा पवार, सुनिल तटकरे आणि रविंद्र चव्हाण अशी बैठक झाली. या बैठकीत जागा वाटपाबाबत तोडगा काढण्यावर चर्चा झाल्याचे समजते.

Follow Us