Uddhav Thackeray : मुंबईत प्रदूषण का वाढलं? इथली हवा आरोग्यासाठी का घातक? उद्धव ठाकरेंनी सांगितलं त्यामागचं कारण

Uddhav Thackeray : भाविकांची, साधू संतांची गैरसोय होता कामा नये हे काम शासनाचं आहे. आज देखील नाशिकचा पालकमंत्री नेमला जात नाही. या कोड्याचं उत्तर कुंभमेळ्याच्या खर्चात आहे का?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

Uddhav Thackeray : मुंबईत प्रदूषण का वाढलं? इथली हवा आरोग्यासाठी का घातक? उद्धव ठाकरेंनी सांगितलं त्यामागचं कारण
Uddhav Thackeray
| Updated on: Nov 28, 2025 | 3:26 PM

“राज्यात सध्या सुरु असलेल्या नगरपालिका, नगर परिषद निवडणुकीत पैशांचा धूर निघतोय. सामनाचा अग्रेलख तुम्ही वाचला असेल. पैशांचा पाऊस, अतिवृष्टी भयानक पद्धतीने महाराष्ट्रात सुरु आहे. सत्तेचा माज, या सर्व राजकर्त्यांच्या वक्तव्यातून, वागणुकीतून पाहतोय. आठ-दहा दिवसांपूर्वी मी शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसलो होतो. त्यांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे एकही मंत्री शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसला नाहीत. जिथे जातात, तिथे पैशांच्या थैल्या उघडतात, मत मागितली जातात हे चित्र भयानक आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“मुंबईत मागच्या दोन ते तीन वर्षात प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर्षी सुद्धा अनुभव घेत आहोत. मुंबईची हवा आरोग्यासाठी घातक होत चालली आहे. इथियोपियामध्ये जो ज्वालामुखीचा उद्रेक झाला, त्याचे ढग इथे आले की काय असं वाटेल. पण इथोयोपियाच्या ज्वालामुखीचा आणि मुंबईच्या प्रदूषणाचा काही संबंध नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “हा इथल्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीची उद्रेक आहे. या भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग मुंबई आणि महाराष्ट्रवर रोरावत आहेत” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

मुंबईत प्रदूषण का वाढलं?

“मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा आरेमधल्या कारशेडला तात्काळ स्थगिती दिली. माझा मेट्रोला विरोध नव्हता. कांजूरमार्गची जागा या सरकारने घेतली आहे. आरेमध्ये जी झाडं कापली त्यामुळे प्रदूषण वाढलय. नियोजन शून्य विकासामुळे प्रदूषण वाढलय” असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. “आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या विकासाचा प्लान आहे. हे एकमेव शहरात असलेलं जंगलं आहे. या जंगलात झाडचं नाही, तर बिबट्यापासून प्राण्यांच्या पिढ्या वर्षानुवर्षापासून इथे राहतायत. आता या उद्यानाच्या विकासाचा प्लान आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

या कोड्याचं उत्तर कुंभमेळ्याच्या खर्चात आहे का?

“जे मुंबईत चालू आहे तेच नाशिकमध्ये चालू आहे. नाशिकमध्ये पुढच्यावर्षी कुंभमेळा होत आहे. हजारो, लाखो साधूसंत, भाविक तिथे येणार. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सुविधा पुरवण्याचं काम सरकारचं आहे. प्रयागराज कुंभमेळ्याच्यावेळी तिथे चेंगराचेंगरी झाली. किती भाविकांना प्राण गमवावे लागले, त्याचा आकडा समोर आलेला नाही. भाविकांची, साधू संतांची गैरसोय होता कामा नये हे काम शासनाचं आहे. आज देखील नाशिकचा पालकमंत्री नेमला जात नाही. या कोड्याचं उत्तर कुंभमेळ्याच्या खर्चात आहे का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us