क्रिकेट खेळताना 24 वर्षीय फलंदाजाचा मृत्यू

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई: कुणाचा मृत्यू कुठे आणि कसा होईल हे सांगता येत नाही. सध्या मैदानात खेळताना होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. भांडुपमध्ये क्रिकेट खेळताना एका 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. वैभव केसरकर असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. भांडुपमध्ये 23 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या टेनिस क्रिकेट स्पर्धेदरम्यान ही धक्कादायक घटना घडली. क्रिकेटचा खेळ अगदी रंगात आला […]

क्रिकेट खेळताना 24 वर्षीय फलंदाजाचा मृत्यू
Follow us on

मुंबई: कुणाचा मृत्यू कुठे आणि कसा होईल हे सांगता येत नाही. सध्या मैदानात खेळताना होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. भांडुपमध्ये क्रिकेट खेळताना एका 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. वैभव केसरकर असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. भांडुपमध्ये 23 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या टेनिस क्रिकेट स्पर्धेदरम्यान ही धक्कादायक घटना घडली.

क्रिकेटचा खेळ अगदी रंगात आला होता. वैभव केसरकर गावदेवी पॅकर्स या संघाकडून फलंदाजी करत होता. मात्र अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं. त्यामुळे त्याने काही वेळ थांबून फलंदाजी सोडली आणि क्षेत्ररक्षणासाठी गेला. पण त्याच्या छातीतील कळ कमी झाली नव्हती. तो तसंच खेळत राहिला. छातीतील कळ कमी न आल्याने अखेर वैभवने डाव अर्धवट सोडला आणि बाहेर जाऊन तो एका खुर्चीवर बसला. त्यानंतरही  छातीत दुखणं न थांबल्यामुळे त्याला जवळच असलेल्या भावसार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी ईसीजी काढताच वैभवला कार्डिअॅक अटॅक आल्याचं स्पष्ट झालं. पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला.

वैभव गेल्या अनेक वर्षापासून टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये भांडुप तसेच आसपासच्या परिसरातील विविध संघांतून खेळत होता. हल्लीच तो त्याच्या कुटुंबीयासह दिव्याला स्थलांतरित झाला होता. पण क्रिकेटच्या वेडापायी त्याची भांडुपशी नाळ कधी तुटली नाही. त्यामुळे त्याच्या अचानक एक्झिटमुळे त्याच्या कुटुंबीयांसहित मित्रांनाही धक्का बसला आहे.

मैदानात खेळताना मृत्यू होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत महिनाभरातील ही तिसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच रस्सीखेच खेळादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला होता.

दरम्यान बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण वयात हृदयविकाराने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. कामाचा ताण, फास्ट फूड कल्चर, अनियमित जेवण, अनियमित व्यायाम यामुळे हृदयविकाराचं प्रमाण वाढलं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.