Nitin Gadkari : प्रधान यांच्यानंतर आता नितीन गडकरी रडारवर? थेट नागपूरच्या घरासमोरच जनआक्रोश मोर्चा; इथेनॉल भोवणार?
नीट पेपर फुटीनंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विरोधात युवा काँग्रेसने नागपूरमध्ये जनआक्रोश आंदोलन पुकारले आहे. शिक्षण व्यवस्था, वाढती बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि इथेनॉल वापरावरून गडकरींना लक्ष्य करत सरकारला जाब विचारण्यात येत आहे. केंद्र सरकारने जनतेच्या समस्यांवर मौन सोडावे, अशी आंदोलकांची मागणी आहे.

नीट पेपर लीकप्रकरणावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अखेर सरकार नमलं आणि शिक्षणंत्री धर्मेद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. भाजप सरकारमधला हा पहिलाच राजीनामा होता. या सराकरमधील पहिल्या मंत्र्याची खुर्ची गेल्यानंतर आता आणखी एक मंत्र्याविरोधात वातावरण तापताना दिसत असून केंद्रातले ज्येष्ठ नेते, मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी याना इथेनॉल भोवण्याची शक्यता असून आता थेट त्यांच्या नागपूरच्या घरासमोरच मोर्चा काढण्यात येणार आहे. नागपूर शहर युवक काँग्रेस तर्फे आज गडकरींच्या घरासमोर जनआक्रोश घेरावचे आयोजन करण्यात आलं असून दुपारी हा मोर्चा निघणार आहे.
शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध ज्वलंत समस्यांवर केंद्र सरकारने मौन सोडावे, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. इथेनॉलच्या वापरावरून गडकरींवर टीका झाल्याचे गेल्या काही दिवसांत दिसलं होतं. तर आता त्यांच्या घरासमोर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मोर्चाची सुरुवात दुपारी 1 वाजता महाल परिसरातील चिटणीस पार्क चौकातून होणार असून, त्यानंतर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते गडकरी यांच्या निवासस्थानाकडे कूच करणार आहेत. मात्र, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त वाढवला असून, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निवासस्थानापर्यंत पोहोचू दिले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोर्चासाठी पोस्टर प्रसिद्ध
दरम्यान, युवक काँग्रेसने या आंदोलनासाठी प्रचार पोस्टर प्रसिद्ध केले असून, त्यावरून केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. पोस्टरमध्ये “धर्मेंद्र प्रधान तो झांकी है… नितीनजी अभी बाकी है!” असा उल्लेख करत केंद्रातील मंत्र्यांविरोधात आक्रमक भूमिका मांडण्यात आली आहे. “प्रश्न आमचे – उत्तर तुमचे” आणि “आश्वासन नाही, हिशेब द्या” अशा घोषणांद्वारे युवक काँग्रेसने सरकारकडे विविध मुद्द्यांवर उत्तरांची मागणी केली आहे. शिक्षण क्षेत्रातील अडचणी, विद्यार्थ्यांच्या समस्या, रोजगाराच्या संधी आणि जनतेशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून, नागपूर शहरातील राजकीय वातावरण या आंदोलनामुळे तापण्याची शक्यता आहे.