झोपडी आंदोलनस्थळी मुख्यमंत्री पोहोचले, बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले….

| Updated on: Dec 29, 2022 | 11:49 PM

पंतप्रधान निवास योजनेतील निकष बदलण्याच्या मागणीसाठी बच्चू कडू यांचं गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात झोपडी आंदोलन सुरुय. त्यांच्या या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अखेर तिसऱ्या दिवशी घेतली.

झोपडी आंदोलनस्थळी मुख्यमंत्री पोहोचले, बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले....
Follow us on

नागपूर : पंतप्रधान निवास योजनेतील निकष बदलण्याच्या मागणीसाठी प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचं गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात झोपडी आंदोलन सुरुय. त्यांच्या या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अखेर तिसऱ्या दिवशी घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री अकरा वाजेच्या सुमारास आंदोलनस्थळी गेले. त्यांनी बच्चू कडू यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यावेळी मंचावर भाषण करताना बच्चू कडू यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

“सरकार बदललं नसतं तर या बाजूने मुख्यमंत्री दिसले नसते. तुमचं घर हे मुख्यमंत्र्यांनी फेसबुकवरच पाहीलं असतं”, असा टोला बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

“तुम्ही आल्यानंतर सामान्य माणसांच्या अपेक्षा वाढल्या आहे”, असं बच्चू कडू एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“मी 20 ते 30 वर्षांच्या राजकारणात असे मुख्यमंत्री पाहिले की ज्यांनी एका झटक्यात दिव्यांग मंत्रालय मंजूर केलं”, असं बच्चू कडू म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भाषण केलं.

‘अपना भिडू बच्चू कडू’, मुख्यमंत्र्यांकडून घोषणेचा उल्लेख

“तुम्ही कडाक्याच्या थंडीत कसे राहता, याचा उल्लेख बच्चू कडू यांनी केला. इकडे शिवसेना भाजप युती आली आहे. ज्याचा कोणी वाली नाही त्याचे वाली बच्चू कडू”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

‘अपना भिडू बच्चू कडू’, या घोषणेचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

“विना आंदोलन दिव्यांग मंत्रालय झालं, ज्यांच्याकडे काही नाही त्यांच्यामागे बच्चू कडू उभे असतात”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“हे सरकार सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. तुमची मागणी मोठी नाही. तुम्हाला राहायला घर पाहिजे. पंतप्रधान आवास योजनेत ग्रामीण व शहरी भागात जी तफावत आहे ती एकसमान करण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहोत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले,

“पालाच्या घरात राहणे साधी सोपी गोष्ट नाही. तुम्हाला साधं घर पाहिजे.तुमचं मोठं स्वप्नं नाही. विदर्भातील अधिवेशनमध्ये आम्ही फार मोठे निर्णय घेतले. आम्ही यासंदर्भात तातळीने बैठक लावू. मोदी यांना विनंती करू”, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.