चिमुकल्याची 128 दिवस मृत्यूशी झुंज; कफ सिरपमुळे अवयव निकामी, अखेर मालवली प्राणज्योत

मध्य प्रदेशच्या छिंदवाडा इथल्या विषारी कफ सिरप प्रकरणात आणखी एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. नागपुरातील रुग्णालयात चार वर्षीय मुलाने अखेरचा श्वास घेतला आहे. हर्षच्या निधनाने त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

चिमुकल्याची 128 दिवस मृत्यूशी झुंज; कफ सिरपमुळे अवयव निकामी, अखेर मालवली प्राणज्योत
Cough Syrup
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 04, 2026 | 12:40 PM

मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया इथं गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात घडलेल्या कोल्ड्रिफ कफ सिरप घोटाळ्याशी संबंधित दु:खद बातमी समोर आली आहे. कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे गंभीर आजारी पडलेल्या बैतुल जिल्ह्यातील एका चार वर्षांच्या मुलाचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला आहे. नागपूरमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत या मुलावर उपचार सुरू होते. या चिमुकल्याने तब्बल 128 दिवस मृत्यूशी झुंज दिली होती. अखेर रविवारी 1 फेब्रुवारी रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. चार वर्षांचा हर्ष हा मूळचा मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया इथला होता. 26 सप्टेंबर रोजी त्याला नागपूरच्या एम्समध्ये भरती करण्यात आलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, बैतुल जिल्ह्यातील आमला तहसीलमधील टिकाबरी गावातले रहिवासी गोकुळ यादव यांचा मुलगा हर्ष हा चार महिन्यांहून अधिक काळ कोमात होता. विषारी कफ सिरपमुळे त्याचे अवयव निकामी झाले होते. सप्टेंबरपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. हर्षचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी सातत्याने प्रयत्न केले होते. परंतु तरीही त्याची प्रकृती सुधारली नव्हती. अखेर रविवारी रात्री उशिरा त्याची प्राणज्योत मालवली. हर्षच्या निधनाच्या वृत्ताने त्याचे पालक पूर्णपणे खचले आहेत. हर्षच्या गावात शोककळा पसरली आहे. आम्ही शेवटपर्यंत आशा बाळगली होती की हर्ष बरा होईल, परंतु नशिबाच्या मनात वेगळंच होतं, अशी भावना त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

सोमवारी नागपूरमध्ये शवविच्छेदनानंतर हर्षचं पार्थिव त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलं. बैतुलचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. मनोज हुरमाडे यांनी याबद्दलची माहिती दिली. हर्षच्या मृत्यूनंतर कोल्ड्रिफ कप सिरप घोटाळ्याबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. जर वेळीच कडक कारवाई झाली असली आणि कफ सिरपचं निरीक्षण योग्य प्रकारे झालं असतं तर निष्पाप मुलाचे प्राण गेले नसते, अशा शब्दांत पीडितांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या याप्रकरणी तपास सुरू आहे.

छिंदवाडा जिल्ह्यात कफ सिरप प्यायल्याने किमान 14 जणांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी खोकल्यासाठी हे औषध दिलं होतं आणि त्यामुळेच मुलांचे मृत्यू होत असल्याचं समोर आलं होतं. याप्रकरण तपास केला असता सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल हा विषारी घटक आढळून आला होता.