काँग्रेस नेते आशिष देशमुख आणि बावनकुळे यांची ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’; देशमुख म्हणाले, राजकीय अनुभवाचा आशीर्वाद…

काँग्रेसने दिलेल्या माझ्या निलंबनाच्या नोटिसला उत्तर दिलं आहे. त्यावर कारवाई झाली नाही. कारवाई होणार नाही. माझं मत पक्षाला पटलं आहे, असं माझं मत आहे, असं काँग्रेस नेते अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेते आशिष देशमुख आणि बावनकुळे यांची ब्रेकफास्ट डिप्लोमसी; देशमुख म्हणाले, राजकीय अनुभवाचा आशीर्वाद...
ashish deshmukh
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 24, 2023 | 10:13 AM

नागपूर : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. देशमुख यांनी सकाळी सकाळीच बावनकुळे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात विधान केल्याने देशमुख यांना काँग्रेसने नोटीस दिली आहे. त्याला देशमुख यांनी उत्तरही दिलं आहे. या नोटिशीवर अजून कोणताही निर्णय काँग्रेसकडून घेण्यात आलेला नाही. त्यापूर्वीच देशमुख यांनी बावनकुळे यांची भेट घेतल्याने राजकीय अर्थ काढले जाऊ लागले आहेत. देशमुख यांनी बावनकुळे यांच्याकडे ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो होतो. कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी देशमुख-बावनकुळे यांच्या भेटीचे आगामी काळात परिणाम दिसतील असं सांगितलं जात आहे.

आशिष देशमुख आज सकाळीच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील कार्यालयात दाखल झाले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकत्र बसून नाश्ता केला. चहा घेतली आणि चर्चाही केली. आशिष देशमुख हे बावनकुळे यांच्या कार्यालयात तब्बल अर्धा ते पाऊणतास होते. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. मात्र, सावनेर आणि काटोलमध्ये भाजपला तगडा उमेदवार हवा आहे. आशिष देशमुख हे भाजपसाठी फायद्याचे ठरू शकतात. त्यामुळे भाजपनेही देशमुख यांच्या दिशेने हात पुढे केला आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून या भेटीचे राजकीय अर्थ काढले जाऊ लागले आहेत.

बावनकुळे जीवलग मित्र

या भेटीनंतर आशिष देशमुख यांनी मीडियाशी संवाद साधला. बावनकुळे हे आमच्यासोबत आमदार होते. मंत्री होते. आमचे त्यावेळचे ऊर्जावान ऊर्जा मंत्री होते. नागपूरसाठी पालकमंत्री त्यांनी उल्लेखनीय काम केलं होतं. नागपूरच्या कोराडी येथील कार्यालयात त्यांनी मला नाश्त्यासाठी बोलावलं. त्यासाठी मी आलो होतो. बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असले तरी आमचे जीवलग मित्र आहेत. ते विधानपरिषदेत आहेत. त्यामुळे काही कामे असतात. त्यांनी नाश्त्याला बोलावलं म्हणून नाही म्हणता आलं नाही, असं त्यांनी सांगितलं.

राजकीय अर्थ नको

माझ्या या भेटीचा तुम्ही राजकीय अर्थ काढू नका. नाश्ता, चहाचा अस्वाद घ्यावा म्हणून आलो होतो. बावनकुळे यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून आलो होतो, असं सूचक विधान करतानाच भाजपच्या नागपूर ग्रामीणची बैठक असली तरी त्याचा या भेटीशी संबंध नाही. त्यांनी नाश्त्याला बोलावलं आणि मी आलो. कालच येणार होतो. पण ते गडबडीत होते. ते म्हणाले, नाश्त्याला ये म्हणून आलो, असंही त्यांनी सांगितलं.

डायरेक्ट नाश्ताच

2009मध्ये मी सावनेरमध्ये चांगली लढत दिली. 2014मध्ये अनिल देशमुख यांना पराभूत केलं. 2019मध्ये मी नागपूर दक्षिण आणि पश्चिममध्ये फडणवीस यांना लढत दिली होती, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. नाश्त्याच्या पलिकडे नक्कीच काही चर्चा झाली नाही. चाय पे चर्चा नाही. नाश्ताच आहे डायरेक्ट, असं ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us