मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री मैदानात, धडाकेबाज प्रचार तरीही बालेकिल्ल्यात पराभव, काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी कसं मारलं मैदान?
Nagpur Graduate Constituency Election 2026: मुख्यमंत्री, महसूलमंत्री, केंद्रीय मंत्री प्रचारासाठी मैदानात उतरले. धडाकेबाज प्रचार यंत्रणा, सुक्ष्म नियोजन तरी भाजपचे गणित कुठं हुकलं? नागपूरसारख्या बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव का झाला? कराळे फॅक्टर चालला की काँग्रेसने डाव परतवला?

Nagpur Graduate Constituency Election 2026: नागपूरचा बालेकिल्ला हातातून गेल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांनी मैदान मारलं. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचारात हिरारीने भाग घेतला. पक्षाने सुधाकर कोहळे यांच्यासाठी सर्व रणनीती वापरली, सुक्ष्म नियोजन केले. धडाकेबाज प्रचार केला. पण प्रत्यक्ष मतदानाचे गणित जुळवण्यात पक्षाला यश आले नाही. नागपूरमध्ये अपक्ष उमेदवार नितेश कराळे फॅक्टर चालला की काँग्रेसने डाव फिरवला याची जोरदार चर्चा सुरू आहे.
भाजपा कुठं बसला फटका?
हक्काच्या बूथवर मतविभाजन
भाजप आणि संघाची नागपूरमध्ये चांगली पकड आहे. नेत्यांनी धडाकेबाज प्रचार केल्यानंतरही हक्काच्या बूथवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसले. हक्काच्या बूथवर मतविभाजन झाले. हक्काच्या बूथवरची नाराजी भाजपला भोवली. ही मते आपलीच ही मानसिकता फटका देणारी ठरली. मतदारांना गृहित धरणं आणि पदवीधरांच्या मूळ मागण्या, त्यांच्या समस्या, अडचणींकडे दुर्लक्ष याचा परिणामही दिसत असल्याची चर्चा आहे.
कार्यकर्त्यांचा अतिआत्मविश्वास नडला
बड्या नेत्यांनी येत एक एक दिवस प्रचार कार्यक्रम राबवला. मुख्यमंत्री, महसूलमंत्री, केंद्रीय मंत्री प्रचारात उतरले. पण ग्राऊंड लेव्हलवर कार्यकर्ते गाफील राहल्याचे अथवा त्यांना अतिआत्मविश्वास नडल्याची जोरदार चर्चा आता पराभवानंतर होत आहे. कार्यकर्त्यांनी बूथ पिंजून काढण्याऐवजी इथं आपलंच मतदान आहे, ते कुठं जातंय? अशी भूमिका घेतल्याने फटका बसल्याचे म्हटले जाते.
संपर्क दाट, पण सुपडे साफ
खरे तर संघ परिवार, कार्यकर्त्यांचे जाळे, सत्ताधारी असतानाही भाजपला करिष्मा करता आला नाही. यंत्रणा पाठीशी असतानाही विजयाचा आत्मविश्वास, प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या क्षमतेकडे दुर्लक्ष या बाबींचा फटका बसला. यामुळे नागपूर विभागात दाट संपर्क असतानाही बालेकिल्ल्यात भाजपला पराभवाचे तोंड पाहावे लागले.
पसंतीक्रमाच्या गणिताकडे दुर्लक्ष
भाजपने मतदारांना कोहळे यांना पहिली पसंती देण्याचे आवाहन केले. पण निवडणुकीचे गणित केवळ पहिल्या पसंतीपुरते मर्यादित नसते. दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीलाही महत्त्व असते. त्यावर निकालाचे गणित फिरते. काँग्रेसने नेमकेच तेच हेरले. कराळे मास्तरांनीही तेच हेरले. पण भाजप इथे कमी पडली. पहिल्या पसंतीचा अट्टाहास त्यांना नडला.
कराळे मास्तरांचा फॅक्टर
नितेश कराळे यांनी या निवडणुकीत हिरारीने प्रचार केला. त्यांनी मैदान गाजवले, त्यांना मैदान मारता आले नाही. नितेश कराळे यांनी पक्षातून हकालपट्टी झाली तरी मैदान सोडले नाही. त्यांनी 25 हजार मतं मिळवली. त्यांच्या फॅक्टरचा मोठा फटका भाजपला बसला. त्यांच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीक्रमाने गणित फिरवले.
काँग्रेसने आव्हान पेलले आणि ते जिंकले
नेमक्या याच बाबी काँग्रेसने केल्या. त्यांनी प्रचार यंत्रणा राबवली. त्यांनी सुक्ष्म नियोजन केले. पहिल्या पसंतीक्रमासोबतच दुसर्या पसंतीक्रमालाही महत्त्व दिले. त्यामुळे अनेक ठिकाणी दुसऱ्या पसंतीक्रमाचा फायदा काँग्रेस उमेदवाराला झाला. पूर्व विदर्भातील काँग्रेसचे आक्रमक नेते आणि त्यांची यंत्रणाही उपयोगी ठरली. तर कराळे मास्तर फॅक्टरही उपयोगात आला.