Nagpur Ashpond : नागपूरकरांना प्यावं लागतंय राखयुक्त पाणी, ॲशपाँडमधून लिकेज झालेली राख थेट कन्हान नदीत

राखेचा बंधारा ओव्हरफ्लो झाल्याने येथील राखयुक्त पाणी कोलार नदीत मिसळत आहे. सतत पाऊस पडत असल्याने या राखेच्या बंधाऱ्यातून होणार ओव्हरफ्लोचे प्रमाण वाढले आहे.

Nagpur Ashpond : नागपूरकरांना प्यावं लागतंय राखयुक्त पाणी, ॲशपाँडमधून लिकेज झालेली राख थेट कन्हान नदीत
ॲशपाँडमधून लिकेज झालेली राख थेट कन्हान नदीत
Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 2:09 PM

नागपूर : कन्हान नदीत पुन्हा राख आल्याने नागपूरकरांना राखयुक्त पाणी प्यावं लागतंय. खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या (Thermal Power Station) वारेगाव (Waregaon) ॲशपॅाण्डमधून राख लिकेज होते. ॲशपॅाण्डमधून लिकेज झालेली राख थेट कन्हान नदीत जाते. कन्हान नदीत राख आल्याने नागपूरच्या काही भागात राखयुक्त पाणीपुरवठा होता. ॲशपॅाण्डच्या ओव्हरफ्लो पॅाइंटवरुन राख आधी कोलारा नदीत आणि नंतर कन्हान नदीत पसरते. त्यामुळं नागपुरातील काही भागात राखयुक्त पाणी येत आहे. ही आरोग्यासाठी धोकादायक घंटा आहे. कन्हान जलशुद्धीकरण विहिरीजवळ राख दिसून आली. खापरखेडा (Khaparkheda) वीज केंद्रातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हजारो लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय.

पूर्व, उत्तर नागपुरात पेयजल संकटाचा धोका

खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती केंद्राची राख कन्हान नदीत मिसळत आहे. त्यामुळं नागपूरकरांवर पुन्हा पेयजल संकट उद्भवू शकते. कन्हान नदीत राख अशीच मिसळत राहिली तर पूर्व आणि उत्तर नागपुरातील पाणीपुरवठा बंद करण्याची वेळ पाणीपुरवठा विभागावर येऊ शकते. काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे कामठीच्या खसाळा येथील राखेचा बंधारा फुटून मोठे नुकसान झाले आहे. अशातच आता शनिवारपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे नागपूरकरांवर पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवू शकते. कारण खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातून निघणाऱ्या फ्लाय अॅशचा बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे.

वॉटर ट्रीटमेंट प्लांट ठेवावा लागला होता बंद

राखेचा बंधारा ओव्हरफ्लो झाल्याने येथील राखयुक्त पाणी कोलार नदीत मिसळत आहे. सतत पाऊस पडत असल्याने या राखेच्या बंधाऱ्यातून होणार ओव्हरफ्लोचे प्रमाण वाढले आहे. पुढे हीच कोलार नदी पाणी पुरवठा विभागाच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटजवळ कन्हान नदीत येऊन मिळते. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे नदीत औष्णिक वीज केंद्रातील राख मिसळत होती. त्यामुळं 9 ते 15 जुलैपर्यंत वॉटर ट्रीटमेंट प्लांट बंद ठेवावा लागला होता. त्यामुळं उत्तर आणि पूर्व नागपूरचा पाणीपुरवठा प्रभावित झाला होता. आता पुन्हा औष्णिक केंद्राची राख नदीत मिसळत आहे. त्यामुळं पुन्हा एकदा पाणीपुरवठा बाधित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.