
संपूर्ण महाराष्ट्राला हादरुक टाकणारी घटना समोर आली आहे. नांदेडमध्ये एका आंतरजातीय प्रेमाला विरोध करताना तरुणीच्या वडिलांनी थेट मुलाची हत्या केली आहे. मुलाची हत्या करण्यासाठी त्यांनी पोटच्या दोन मुलांची मदत घेतली. या सगळ्या प्रकरणानंतर तरुणीने पोलिसात धाव घेत वडील आणि भावांविरोधात तक्रार केली आहे. तसेच तिने तिघांनाही फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. आता प्रकरण नेमकं काय आहे चला जाणून घेऊया…
तीन वर्षांपासून प्रेम, पण जातीमुळे जीव घेतला
२५ वर्षीय सक्षम ताटे आणि २१ वर्षीय आंचल मामीडवार यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आंचलच्या कुटुंबाला हे नाते मान्य नव्हते कारण दोघे वेगवेगळ्या जातीचे होते. आंचलच्या वडिलांचे नाव गजानन मामीडवार, तर दोन्ही भाऊ हिमेश आणि साहिल अशी नावे आहेत. या तिघांनीच सक्षमची हत्या केल्याचे आंचलने पोलिसांना सांगितले. आंचलच्या म्हणण्यानुसार, “सक्षमवर याआधी एमपीडीए (MPDA) लावण्यात आला होता. तो सुटून आल्यानंतर माझे वडील आणि भाऊ त्याला ठार मारण्याच्या मागे लागले होते. मला सतत धमक्या मिळत होत्या की, त्याला संपवणारच.”
गोळ्या झाडल्या तरी जिवंत होता, मग…
आंचलने घडलेला प्रकार सांगताना म्हटले की, “त्यांनी सक्षमला गोड बोलून भेटायला बोलावले. नशा करून त्याला बेशुद्ध केले. मग त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. तीन गोळ्या लागूनही सक्षम जिवंत होता. शेवटी माझ्या भावांनी त्याच्या डोक्यात फरशी आणि जड वस्तूने वार करून त्याची हत्या केली.”
मृतदेहाशी लग्न आणि फाशीची मागणी
सक्षमच्या अंत्यसंस्कारापूर्वी आंचलने ठाम निर्णय घेतला. तिने सक्षमच्या पार्थिवाला हळद-कुंकू लावले, मंगळसूत्र घातले आणि त्याच्याशी औपचारिक लग्न केले. रडत रडत ती म्हणाली, “माझ्या वडिलांनी आणि भावांनी आमचे प्रेम हिरावले, पण ते हरले. सक्षम मेला तरी जिंकला. मी कुणाच्या दबावाखाली नाही. मी सक्षमची आहे आणि आयुष्यभर सक्षमचीच राहीन. माझ्या वडिलांना आणि दोन्ही भावांना फाशीची शिक्षा व्हावी हीच माझी इच्छा आहे.” ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर आंचलच्या धैर्याचे आणि प्रेमाच्या निर्धाराचे कौतुक होत आहे, तर कुटुंबातीलच लोकांनी केलेल्या या क्रूर कृत्याचा तीव्र निषेध केला जात आहे. सध्या तिघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.