आधी MBBS, आता UPSC, लाँड्रीचालकाच्या मुलाची हार न मानता सहाव्या प्रयत्नात यशाला गवसणी

डॉक्टर शिवराज गंगावळ यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण नांदेड शहरातील प्रतिभा निकेतन हायस्कूलमध्ये झाले. बारावीचे शिक्षण यशवंत महाविद्यालयातून तर वैद्यकीय शिक्षण कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले.

आधी MBBS, आता UPSC, लाँड्रीचालकाच्या मुलाची हार न मानता सहाव्या प्रयत्नात यशाला गवसणी
डॉक्टर शिवराज गंगावळ
| Updated on: Apr 29, 2025 | 11:55 AM

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी यूपीएससी परीक्षा जगातील सर्वात कठीण परीक्षा आहे. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी लाखो विद्यार्थी कसून मेहनत करत असतात. परंतु यश शेकडो परीक्षार्थींनी मिळते. मेंढपाळाचा मुलगा असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील बिरदेव डोणे यांनी यूपीएससीत यश मिळवून देशभराचे लक्ष आपल्याकडे वेधले. तसेच नांदेडमधून एका लाँड्री चालकाच्या डॉक्टर मुलाने नागरी सेवेत यश मिळवले. डॉ. शिवराज राजेश गंगावळ असे या तरुणाचे नाव असून एमबीबीएस करून यूपीएसीच्या माध्यमातून यश संपादन केले आहे. त्यांनी ७८८ वी रँक पटकवली आहे.

शिवराज गंगावळ यांचे वडील राजेश गंगावळ हे लाँड्रीचा व्यवसाय करतात. कठीण परिस्थितीत त्यांनी तिन्ही मुलांना शिकवले. मुलांच्या शिक्षणासाठी राजेश गंगावळ हे अथक प्रयत्न केले. त्यांच्या या कष्टाचे चीज करत शिवराज यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. डॉक्टर झाल्यावरही मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. मुखेड तालुक्यातील बारहाळी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असतानाही त्यांनी यूपीएससीची तयारी सुरु केली. पण पाच वेळा अपयश आले. त्यानंतर खचून न जाता त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर सहाव्यांदा शिवराज यांने यूपीएससीत यश प्राप्त करून दाखविले.

डॉक्टर शिवराज गंगावळ परिवारासोबत

डॉक्टर शिवराज गंगावळ यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण नांदेड शहरातील प्रतिभा निकेतन हायस्कूलमध्ये झाले. बारावीचे शिक्षण यशवंत महाविद्यालयातून तर वैद्यकीय शिक्षण कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. डॉ. शिवराज गंगावळ हे सध्या मुखेड तालुक्यातील बारहाळी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

डॉक्टर शिवराज गंगावळ यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले की, लहानपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. ते आता पूर्ण झाले आहे. एमबीबीएस झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असताना यूपीएससीची तयारी करत राहिलो. त्यात यश मिळवण्यासाठी मेहनत आणि योग्य मार्गदर्शनसोबत कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्वाचा आहे. यूपीएससीसाठी हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क यांचे कॉम्बिनेशन गरजेचे आहे.