गोकुळ गीतेंकडून वडिलांचा पराभव, नरेंद्र दराडे यांच्या मुलीला अश्रू अनावर, थेट मतदान केंद्रात..
नाशिक विधान परिषदेमध्ये धक्कादायक गोष्टी घडताना दिसत आहेत. नरेंद्र दराडे यांचा मोठा परभव झाला. त्यांच्या या पराभवानंतर त्यांनी गंभीर आरोप केले, हेच नाही तर यावेळी त्यांची मुलगी भावूक होताना दिसली.

राज्यातील विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागले आहेत. 6 जागा बिनविरोध होत्या तर आज 11 जागांचे निकाल हाती येत आहेत. महायुतीचे या निकालात वर्चस्व बघायला मिळत आहे. नाशिकमध्ये धक्कादायक निकाल लागला. महायुतीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. थेट अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी झाले. गोकुळ गीते भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या अत्यंत जवळचे आहेत. गोकुळ गीते यांनी महायुतीकडून उमेदवारी मिळवण्याकरिता प्रयत्न केले. गिरीश महाजन यांनीही त्याकरिता कस लावली होती. मात्र, ही जागा शिंदेंकडे गेली. शिंदेंकडून थेट नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, तिथेच मोठा घात झाला. थेट भाजपाच्या सर्व मतदारांनी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना पाठिंबा देत मतदान केले. महायुतीकडून विश्वास घात झाल्याची पहिली प्रतिक्रिया यादरम्यान महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी दिली.
अंधारात ठेऊन माझा पराभव करण्यात आला. महायुतीच्या सर्वच नेत्यांनी विश्वासघात केल्याची भावना यादरम्यान त्यांनी बोलून दाखवली. नरेंद्र दराडे यांच्या पराभवाची कारणे एकनाथ शिंदे यांनी मागून घेतली. एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली. गिरीश महाजन यांनी पाठीमागून गोकुळ गीते यांनाच पाठिंबा दिल्याचे सांगितले जाते.
शिंदे सोडले तर महायुतीच्या सर्वच नेत्यांनी आपला विश्वासघात केल्याचे नरेंद्र दराडे यांनी म्हटले. दुसरीकडे गोकुळ गीते यांनी म्हटले की, मी प्रचार केला नाही पण माझ्या कार्यकर्त्यांनी माझा प्रचार केला. त्यांनी ऐकले नाही. निवडणुकीत माझा बाप काढला गेल्याचाही त्यांनी यादरम्यान आरोप केला. नाशिकमधील निकालाने आपल्याला धक्का बसल्याचे मोठे विधान गिरीश महाजन यांनी केले.
यादरम्यानच महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या पराभवानंतर त्यांची मुलगी भावूक झाली. गोकुळ गीते यांनी आघाडी घेताच नरेंद्र दराडे आणि त्यांच्या कन्या मतमोजणी केंद्र सोडताना दिसल्या. सगळ्या नेत्यांनी विश्वासघात केला म्हणत प्रियंका दराडे काकड यांना अश्रू अनावर झाले. हा फक्त नरेंद्र दराडे यांनाच नाही तर थेट एकनाथ शिंदे यांना मोठा झटका असल्याचेही बोलले जात आहे.