
अध्यात्म आणि दैवी शक्तीचा बनाव रचून महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सध्या अशोक खरात हा पोलिसांच्या कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. भोंदू बाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीतील चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. नाशिक पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर आता खरातने तपासादरम्यान अत्यंत विचित्र प्रतिक्रिया दिली असून त्याने स्वतःच्या कृत्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी सुरू असताना अशोक खरातने पोलिसांना सांगितले की, माझ्या अंतर्मनानेच मला आज धोका दिला आहे. मी आजवर ज्यांचे ज्यांचे भले केले, तेच लोक आज माझ्यावर उलटले आहेत, असे अशोक खरात म्हणाला. तसेच महिलांसोबत केलेल्या अश्लील आणि आक्षेपार्ह कृत्यांबाबत विचारले असता त्याने अत्यंत निर्लज्जपणे उत्तर दिले. मी जे काही केले, तो विधीचाच एक भाग होता. मी कोणावरही जबरदस्ती केलेली नाही, असे अशोक खरात चौकशीदरम्यान म्हणाला.
विशेष बाब म्हणजे अशोक खरात हा पोलीस कोठडीत असतानाही त्याचे ढोंग सोडायला तयार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कोठडीत बसल्या जागी तो सतत मंत्रजप करत असतो, असे पोलिसांचे म्हणणं आहे. आता इथून पुढे मी कोणाचेही ऐकणार नाही, फक्त माझ्या मेंदूचेच ऐकणार, असेही तो वारंवार पुटपुटत असतो. त्याच्या या विचित्र वागण्यामुळे पोलीस यंत्रणाही थक्क झाली आहे.
अशोक खरातने विधीच्या नावाखाली अनेक महिलांना जाळ्यात ओढले आणि त्यांच्या असहायतेचा फायदा घेतला. पोलिसांनी त्याच्या मालमत्तेची आणि संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचीही चौकशी सुरु केली आहे. अशा कोणत्याही भोंदू बाबांच्या किंवा चमत्काराच्या दाव्यांना बळी पडू नका. तसेच कोणाची फसवणूक झाली असल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन नाशिक पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
दरम्यान नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य आणि गुंतागुंत लक्षात घेऊन विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. एसआयटी सध्या खरातच्या मालमत्तेची, त्याच्या बँक व्यवहारांची आणि त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची कसून चौकशी करत आहे. खरातने केवळ महिलांचे शोषणच केले नाही, तर अनेकांना कामाचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातल्याचेही समोर आले आहे.