14 मुलं होती, 6 विकली… नाशिक जिल्हा हादरला, खरं काय खोटं काय? मोठी अपडेट आली समोर

त्र्यंबकेश्वर येथे एका आदिवासी मातेने दारिद्र्यातून आपल्या 14 मुलांपैकी 6 मुलांना पैशांसाठी विकल्याचा संशय आहे. विक्री झाली की हस्तांतरण, हे निश्चित करण्यासाठी पोलीस आणि बाल कल्याण समिती (CWC) मार्फत सखोल तपास सुरू आहे.

14 मुलं होती, 6 विकली... नाशिक जिल्हा हादरला, खरं काय खोटं काय? मोठी अपडेट आली समोर
nashik 1
| Updated on: Dec 10, 2025 | 3:03 PM

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घोटीजवळील भरड्याची वाडी येथे 14 मुलांच्या जन्मदात्या आईने आपल्या 6 मुलांना पैशांसाठी विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गंभीर आणि हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या दाव्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने तातडीने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या या आदिवासी कुटुंबातील मुलांच्या नेमक्या संख्येबद्दल आणि त्यांच्या हस्तांतरणाबद्दल आता विविध माहिती समोर येत आहे.

नेमकं काय घडलं?

सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेदेवगाव येथील भरड्याची वाडी येथे राहणाऱ्या एका महिलेला एकूण 14 मुले होती. या 45 वर्षीय महिलेची परिस्थिती इतकी वाईट आहे की तिला तिच्या 14 मुलांपैकी 4 ते 6 मुलांना पैशांसाठी विकावे लागले. मधे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला 14 वे मूल झाले तेव्हा ती तपासणीलाही गेली नव्हती. सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला रुग्णालयात दाखल करून तिची सुरक्षित प्रसूती केली. मात्र, डिलिव्हरी होऊन दोन महिने झाले असतानाच त्या मातेने ते बाळ अवघ्या 10 हजारांमध्ये एका व्यक्तीला विकल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

भगवान मधे यांनी या घटनेसाठी प्रशासन आणि शासनाला जबाबदार धरले आहे. आजही पैशासाठी कुठल्याही मातेला आपल्या पोटच्या गोळ्याला विकावं लागतं, याला सर्वस्व जबाबदार प्रशासन आहे. त्यांनी आतापर्यंत काय केलं? या मातेला घरकुल मिळालं नाही, असा आरोप भगवान मधे यांनी केलात. या प्रकरणी बालविकास विभागाला संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पोलिस तातडीने घटनास्थळी

तसेच स्थानिक आशा सेविका जेव्हा वजन काटा घेऊन या कुटुंबाच्या घरी गेल्या. तेव्हा महिलेने बाळ नाही, देऊन टाकले, असे सांगितले. हे बाळ दीड महिन्याचे होते आणि इतर तीन-चार बाळे त्या ठिकाणी घरी होती. आशा सेविकेने याबद्दल लगेचच वरिष्ठांना कल्पना दिली आणि त्या बाळाचा पाठपुरावा सुरू केला.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पोलीस प्रशासन आणि तहसील कार्यालयाचे अधिकारी तातडीने महिलेच्या घरी पोहोचले. संशयित दाम्पत्य सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याची प्राथमिक माहिती आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार काही मुले विकली गेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी प्रत्यक्ष जाऊन माहिती घेतली.

पोलिस काय म्हणाले?

यावेळी त्यांना कुटुंबात 14 पैकी 12 मुले जिवंत मुले असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 1 मूल मयत आहे. तर 3 मुले तीन वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. पोलिसांनी ज्यांच्याकडे ही मुले दिली होती, त्या तिन्ही कुटुंबांना आणि मुलांना घोटी पोलीस स्टेशनला आणले आहे. सध्या आई-वडील आणि इतर 11 मुले घोटी पोलीस स्टेशनमध्ये आहेत.

पोलीस अधीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, मुलांच्या विक्री किंवा हस्तांतरणाच्या या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आता चाईल्ड वेल्फेअर कमिटी (CWC) मार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. सध्या संशयित दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात असल्याची प्राथमिक माहिती आहे. भरड्याची वाडी येथे तपासणी केली असता, पोलिसांना घरी चार मुले आढळली होती. आई-वडील आणि सर्व मुलांना घोटी पोलीस स्टेशन येथे आणले असून, CWC मार्फत प्रत्येक मुलाची आणि कुटुंबाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

कठोर कारवाई करणार

CWC कडून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. परिस्थिती हलाखीची असल्याने विक्री झाली की हस्तांतरण झाले, हे चौकशीअंती स्पष्ट होणार आहे. हे संपूर्ण प्रकरण दारिद्र्य आणि उपासमारीतून घडले आहे की यामागे कोणताही संघटित गुन्हा आहे, याचा तपास पोलीस आणि बाल कल्याण समिती करत आहे.