घरातून उचलून आणेन…; सुट्टी घेतल्याने ठाण्यात मोठा राडा, मालकाने थेट बंदूकच रोखली, पोलिसांना तपासात भलताच मॅटर समोर
एका दिवसाची सुट्टी घेतल्याने ठाण्यातील घरमालकिणीने घरकाम करणाऱ्या महिलेला शिवीगाळ करत चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. वादातून मालकाच्या मुलाने थेट बंदूक रोखली.

एका दिवसाची रजा घेऊन ४ दिवस कामावर न आल्याने घरमालकीण आणि घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबात मोठा वाद झाला. या वादातून घर मालकिणीच्या मुलाने घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घरमालकीण आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतले असता पोलीस तपासात नवी माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, घोडबंदर रोडवरील वाघबीळ येथील जानगिड गॅलॅक्सी टॉवरमध्ये राहणाऱ्या मोनिका शर्मा यांच्याकडे एक महिला गेल्या सहा महिन्यांपासून घरकाम करत होती. या महिलेने ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक दिवसाची सुट्टी घेतली होती. मात्र, ४ दिवस उलटूनही ही महिला कामावर आली नाही. त्यामुळे मोनिका शर्मा यांनी तिला वारंवार फोन केले. पण तिने काहीही प्रतिसाद दिला नाही.
यानंतर मोनिका शर्मा यांनी पुन्हा एकदा तिला फोन केला. घरकाम करणाऱ्या महिलेने फोन उचलताच संतप्त झालेल्या मोनिका शर्मा आणि त्यांच्या मुलाने महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तुला आणि तुझ्या नवऱ्याला जिथे असाल तिथून उचलून आणू,” अशी उघड धमकी मोनिका शर्मा यांनी दिली.
धाक दाखवण्यासाठी बंदूक रोखली अन्…
हा घडलेला सर्व प्रकार पीडित महिलेने तिच्या नातेवाईकांना सांगितला. यानंतर पीडित महिलेचे नातेवाईक जाब विचारण्यासाठी घरमालकिणीच्या घराजवळ पोहोचले. यावेळी घरमालकीण, तिचा मुलगा, पीडित महिला आणि तिच्या नातेवाईकांमध्ये वाद झाला. याच वादादरम्यान घरमालकिणीच्या मुलाने धाक दाखवण्यासाठी त्यांच्यावर थेट बंदूक रोखली.
या प्रकाराने घाबरलेल्या कुटुंबाने तातडीने कासारवडवली पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चौकशी सुरू केली. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये त्या घरमालिकिणीच्या मुलाने वापरलेली वस्तू ही खरी बंदूक नसून, बंदुकीप्रमाणे हुबेहूब दिसणारा लाईटर असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी घरमालकीण मोनिका शर्मा आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर योग्य ती पुढील कारवाई सुरू आहे.
कठोर कारवाई करण्याची मागणी
या प्रकरणाची माहिती मिळताच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पोलीस ठाण्यात धाव घेत पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. पीडित महिलेने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आहे. तसेच घरमालकिणीने फोनवर दिलेल्या धमक्यांचे कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे सादर केले आहे. महिलेने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
