नाशिक हनी ट्रॅपप्रकरणी मोठी अपडेट, त्या हॉटेलची चौकशी होणार; लवकरच अधिकाऱ्यांची नावे समोर येणार?

नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणात ७२ पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी आणि काही माजी मंत्री अडकले असल्याचे समोर आले आहे. सध्या गुप्त चौकशी सुरू असून आर्थिक व्यवहार आणि जमीन व्यवहारांचा तपास केला जात आहे. मोबाईल फोन फॉर्मेट केल्याच्या घटना आणि माहिती दडवण्याचे प्रयत्नही समोर आले आहेत.

नाशिक हनी ट्रॅपप्रकरणी मोठी अपडेट, त्या हॉटेलची चौकशी होणार; लवकरच अधिकाऱ्यांची नावे समोर येणार?
honey trap
| Edited By: | Updated on: Jul 22, 2025 | 12:08 PM

नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या हनी ट्रॅप प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज्यातील एका बड्या नेत्याने अनौपचारिक गप्पांदरम्यान हनी ट्रॅपबद्दल मोठा खुलासा केला. तब्बल ७२ वरिष्ठ अधिकारी आणि काही आजी-माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा गौप्यस्फोट त्याने केला होता. आता या प्रकरणी एक नवी अपडेट समोर आली आहे.

नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची सध्या गुप्त पद्धतीने चौकशी सुरु आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आता संबंधित अधिकाऱ्यांच्या अंतर्गत चौकशीला सुरुवात झाली आहे. हे प्रकरण केवळ लैंगिक शोषणापुरते मर्यादित नसून, यात मोठे आर्थिक व्यवहार आणि बड्या व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चौकशीत अनेक महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी एका हॉटेल व्यावसायिकाच्या संस्थांना मदत केली होती का, याची सखोल तपासणी केली जात आहे. तसेच त्या हॉटेल व्यावसायिकाच्या जमिनीच्या व्यवहारांबाबतही कसून चौकशी केली जाणार आहे. कारण यात संशयास्पद व्यवहार झाल्याची शक्यता आहे.

अनेक बड्या व्यक्ती अडचणीत

नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स आणि त्यांचे विविध संबंध तपासणीच्या चौकटीत आणले जात आहेत. तसेच, गुन्हे शाखा आणि गुप्तचर विभाग यांनी संयुक्तपणे माहिती संकलन मोहीम हाती घेतली आहे. या तपासादरम्यान संशयास्पद आर्थिक देवाणघेवाण झाल्याने ते उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे अनेक बड्या व्यक्ती अडचणीत येऊ शकतात.

सध्या पोलिस प्रशासनाचे लक्ष या प्रकरणातील गुंतवणूकदारांवर आणि अडकलेल्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर केंद्रित झाले आहे. जर चौकशीत कोणी दोषी आढळल्यास, संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत मिळत आहेत. या हनी ट्रॅप प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी सध्या वेगाने चौकशी वेगाने सुरु आहे. लवकरच याबद्दल आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचे पडसाद नाशिकसह राज्यभरातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात उमटण्याची शक्यता आहे.

मोबाईल फोन फॉर्मेट

दरम्यान काही दिवसांपूर्वी हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या काही संशयित अधिकाऱ्यांनी तातडीने आपले मोबाईल फोन फॉर्मेट केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. तसेच, या प्रकरणात अडकलेले काही अधिकारी आणि राजकीय व्यक्तींनी आपले संबंध लपवण्यासाठी तसेच माहिती दडवण्यासाठी परस्परांमध्ये समन्वय साधल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. .