राज्याच्या राजकारणात खळबळ, हनी ट्रॅपप्रकरणी संशयित अधिकाऱ्यांनी उचललं मोठं पाऊल

महाराष्ट्रातील एका मोठ्या हनीट्रॅप प्रकरणाने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ७२ पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकारी आणि काही माजी मंत्री या प्रकरणात अडकले असल्याचे वृत्त आहे. नाशिकमधील एका नेत्याने याची माहिती दिली.

राज्याच्या राजकारणात खळबळ, हनी ट्रॅपप्रकरणी संशयित अधिकाऱ्यांनी उचललं मोठं पाऊल
honey trap
| Edited By: | Updated on: Jul 16, 2025 | 9:33 AM

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका मोठ्या हनी ट्रॅप प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील तब्बल ७२ वरिष्ठ अधिकारी आणि काही आजी-माजी मंत्री ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली जात होती. नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज्यातील एका बड्या नेत्याने अनौपचारिक गप्पांदरम्यान हा गौप्यस्फोट केला जात होता. आता या प्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे.

प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

नाशिकसह राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सध्या एका मोठ्या हनी ट्रॅप प्रकरणाची गुप्त चौकशी सुरु आहे. यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील ७२ हून अधिक अधिकारी आणि काही माजी मंत्री या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाची पाळेमुळे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, आणि औरंगाबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये पसरलेली आहे. राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठे पडसाद उमटत आहेत.

मोबाईल फोन फॉर्मेट

टीव्ही 9 मराठीने ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या काही संशयित अधिकाऱ्यांनी तातडीने आपले मोबाईल फोन फॉर्मेट केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच, या प्रकरणात अडकलेले काही अधिकारी आणि राजकीय व्यक्तींनी आपले संबंध लपवण्यासाठी तसेच माहिती दडवण्यासाठी परस्परांमध्ये समन्वय साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चौकशीत धक्कादायक गोष्टी उघड होणार

या प्रकरणाची सध्या गुप्त पद्धतीने चौकशी सुरु आहे. या  चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. यात संशयित व्यक्तींचे व्हिडिओ कॉल्स, हॉटेलमधील भेटी आणि मोठे आर्थिक व्यवहार यांचे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता अनेक बड्या व्यक्तींनी ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’ या तत्वावर मौन बाळगले आहे. त्यामुळे हे प्रकरणं गभीर असल्याचे बोललं जात आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यात अनेक बड्या नेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गुप्त चौकशीतून नेमकं काय बाहेर येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.