Nashik Omicron| सर्व यात्रांवर बंदी, लसीकरण न झाल्यास कटू निर्णय; मंत्री भुजबळांनी काय दिला इशारा?

| Updated on: Jan 07, 2022 | 10:20 AM

जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, साधारण 9 लाख लस जिल्ह्यात शिल्लक आहेत. आजच्या स्थितीला मालेगांवमध्ये 70 टक्के नागरिकांचा पहिला डोस, तर 42 टक्के नागकिांचा लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण झालेला आहे.

Nashik Omicron| सर्व यात्रांवर बंदी, लसीकरण न झाल्यास कटू निर्णय; मंत्री भुजबळांनी काय दिला इशारा?
Guardian Minister Chhagan Bhujbal
Follow us on

नाशिकः नाशिक जिल्ह्यात वाढणारे कोरोना रुग्ण, ओमिक्रॉनचा झपाट्याने होणारा प्रसार आणि लसीकरणाकडे नागरिकांनी फिरवलेली पाठ सध्या प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरतेय. कितीही आवाहन करून चक्क पहिला डोस घतलेले अनेक नागरिक दुसरा डोस घेताना दिसत नाहीत. या अक्षम्य बेपर्वाइकडे अतिशय गंभीरपणे पाहणार असल्याचा इशारा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. नागरिकांनी स्वतःच्या नव्हे, तर इतरांच्या आरोग्याकडे तरी लक्ष द्यावे. अन्यथा एक कटू निर्णय घेण्यात येईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

लसीकरणावर चर्चा

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यातील लसीकरणाचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य उपसंचालक पी. एस. गांडाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाने नागरिकांनी लसीकरणाकडे कशी पाठ फिरवली आहे, हे गाऱ्हाणे पालकमंत्र्यांपुढे मांडले. यावेळी पालकमंत्र्यांनी आक्रमक होत, याबाबत योग्य ती कारवाई करण्याचा इशारा दिला.

9 लाख लस पडून

जिल्ह्याची कोरोना सद्यस्थितीची माहिती देतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्यात येत आहे. यामध्ये दरदिवसाला साधारण 30 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. तसेच साधारण 9 लाख लस जिल्ह्यात शिल्लक आहेत. त्याचप्रमाणे मालेगावमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. आजच्या स्थितीला मालेगांवमध्ये 70 टक्के नागरिकांचा पहिला डोस तर 42 टक्के नागकिांचा लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण झालेला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात 600 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिंती करण्यात आली असून, पुरेशा प्रमाणात बेड्स व औषधसाठा उपलब्ध आहे. तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत मालेगावमधील कोरोना रुग्णांची संख्या अत्यल्प असल्याने तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत अभ्यास गट गठित करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

काय दिला इशारा?

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ज्या नागरिकांचा लसीकरणाचा दुसरा डोस बाकी आहे. तो वेळेत घ्यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणामार्फत आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे गेल्या आठ दिवसांत वाढलेली रुग्णसंख्या पाहता लग्नसमारंभ साधेपणाने करावे. समांरभामध्ये 50 पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास महसूल व पोलीस यंत्रणा यांच्यामार्फत संयुक्तपणे संबंधित आयोजकांवर कडक कारवाई करावी. नागरिकांनी लसीकरण वेळेत करून घ्यावे.वअन्यथा वेळेत लसीकरण न झाल्यास ‘नो व्हॅक्सिनेशन, नो रेशन’ असा कटू निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

सर्व यात्रांवर बंदी

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व यात्रांवर बंदी राहील. तसेच धार्मिक स्थळांमध्ये कोरोनाच्या सर्वं नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तेथील पुजारी, विश्वस्त यांची असेल. सर्व शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये लसीकरणाशिवाय प्रवेश नाही, याबाबतची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करण्यात यावी. तसेच सर्व नागरिकांनी तिसऱ्या लाटेचा धोका वाढू नये यासाठी स्वत: सोबतच आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन, शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी केले.

इतर बातम्याः

Nashik Corona| नाशिकमधील शाळा सोमवारपासून बंद; कुठले वर्ग राहणार सुरू?

Nashik |नाशिकमध्ये 52 हजार 324 नवमतदार; एकूण संख्या तब्बल 46 लाखांच्या पुढे, पण दुबार नावांचे काय?

Nashik | नाशिकमध्ये BOSCH कंपनीला दणका; 730 कामगारांना कामावर घेण्याचे आदेश