
येवला तालुक्यातील रहाडी-भारम रोडवर स्कूल बस पलटी होऊन त्यात तीन विद्यार्थ्यांसह चालक जखमी झाल्याची घटना घडली आहे. रहाडीकडून येवल्याच्या दिशेने येणाऱ्या स्कूल बसला हा अपघात झाला.

येवल्यातल्या रहाडी-भारम रोडवर हा अपघात झाला. अपघात स्थळ निर्जन आहे. येणारी-जाणारी वाहने थांबली तरच मदत मिळते. मात्र, या विद्यार्थी आणि चालकाच्या सुदैवाने त्यांना तातडीने मदत मिळाली.

अपघाताताची बातमी समजल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनात चिंतेचे काहूर दाटले. अनेकांनी मिळेल त्या वाहनाने अपघातस्थळी धाव घेतली, तर अनेकांनी रुग्णालय गाठले. विद्यार्थ्यांना पाहताच त्यांच्या जीवात जीव आला.

राज्यभरात स्कूल बस अपघाताच्या अनेक घटना घडतात. हे पाहता स्कूल बस चालकांना विशेष प्रशिक्षण द्यावे. त्यांच्या बसच्या स्पीडला मर्यादा ठरवून द्याव्यात, त्यांना लॉक घालावे, अशी मागणी होत आहे.

स्कूल बस चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी झाली. यातील तीन विद्यार्थी व चालक हे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचाराकरिता शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.