‘ते जर आमच्याकडे आले, तर आम्ही त्यांना…’, ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याला घेण्याची भाजपाची तयारी

| Updated on: Sep 25, 2023 | 12:30 PM

उद्धव ठाकरे गटात एक इनकमिंग तर दुसरा बडा नेता आऊट गोईंगच्या मार्गावर. ठाकरे गट आता यातून कसा मार्ग काढणार?. भाजपाने ठाकरे गटाच्या या मोठ्या नेत्याला पक्षात घेण्याची तयारी दाखवलीय. त्यामुळे ठाकरे गटाला आणखी एक झटका बसू शकतो.

ते जर आमच्याकडे आले, तर आम्ही त्यांना..., ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याला घेण्याची भाजपाची तयारी
Follow us on

नाशिक (चैतन्य गायकवाड) : शिर्डी लोकसभेच्या जागेवरुन उद्धव ठाकरे गटात फाटाफूट होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावरुन ठाकरे गटातील एक मोठा नेता नाराज आहे. या नाराजीपायी ते पक्षाला सोडचिठ्ठी देणार का? अशी सुद्धा नगरच्या राजकारणात चर्चा रंगली आहे. आपली नाराजी या नेत्याने पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. आता ठाकरे गट या वादात कसा मार्ग काढतो ते पहावा लागेल. कारण ठाकरे गटातून बाहेर पडल्यास भाजपा सुद्धा या नेत्याला घ्यायला तयार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वी भाऊसाहेब वाकचौरे यांनी भाजपाला सोडून ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावरुन विधानसभेत पाच वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री बबनराव घोलप नाराज आहेत. बबनराव घोलप यांनी पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला.

बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण आता ही जागा भाऊसाहेब वाकचौरे यांना मिळू शकते, त्यामुळे बबनराव घोलप नाराज असल्याची माहिती आहे. सत्तातरांमध्ये घोलप पितापुत्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. काही दिवसांपूर्वी माजी आमदार योगेश घोलप यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ते बबनराव घोलप यांचे सुपूत्र आहेत. “माझे वडील बबनराव घोलप यांची म्हणण्यापेक्षा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेची अशी इच्छा होती की त्यांनी लोकसभा लढावी. पक्षाशी गद्दारी केलेल्या भाऊसाहेब वाघचौरे यांचा पक्ष प्रवेश हा आम्हाला पटणारा नाही” असं योगेश घोलप म्हणाले

बावनकुळे ठाकरे गटाच्या या नेत्याबद्दल काय म्हणाले?

आता ठाकरे गटाचे नाराज उपनेते माजी मंत्री बबन घोलप यांच्याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “बबन घोलप आमच्याकडे आले, तर आम्ही नाही म्हणणार नाही. त्यांनी ती निवड करायची आहे. आम्ही कुणाला आमच्या पक्षात या, असं म्हणत नाही” असं बावनकुळे म्हणाले. बबन घोलप यांच्या कन्या आणि स्थानिक भाजपा नेत्या तनुजा घोलप यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.