जनगणनेसाठी संसदेत आवाज उठवूनही आकडेवारी न आल्यानेच ओबीसींचं नुकसान; भुजबळांचा आरोप

| Updated on: Jun 13, 2021 | 8:25 AM

ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी मोठं विधान केलं आहे. ओबीसींच्या जनगणना झाल्याशिवाय ओबीसींना न्याय मिळणार नाही.

जनगणनेसाठी संसदेत आवाज उठवूनही आकडेवारी न आल्यानेच ओबीसींचं नुकसान; भुजबळांचा आरोप
chhagan bhujbal
Follow us on

नाशिक: ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. ओबीसींच्या जनगणना झाल्याशिवाय ओबीसींना न्याय मिळणार नाही. त्यामुळे ओबीसींच्या जनगणनेसाठी आम्ही पाठपुरावा केला. संसदेत आवाजही उठवला. मात्र, अद्यापही आकडेवारी जनतेसमोर आली नाही, त्यामुळे ओबीसी वर्गाचं मोठं नुकसान झालं आहे, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. (chhagan bhujbal slams bjp over obc reservation issue)

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या २२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने छगन भुजबळ यांनी शनिवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा आरोप केला. व्ही.पी.सिंग सरकारच्या काळात ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्रात शरद पवारांनी मंडल आयोगाची अमलबजावणी करून ओबीसींना अधिकार मिळवून दिले. या ओबीसी वर्गाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तसेच आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे सोडविण्यासाठी ओबीसींची जनगणना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी माजी खासदार समीर भुजबळ यांनी संसदेत हा प्रश्न मांडून ओबीसी जनगणना करण्यास पाठपुरवा केला. मात्र अद्याप देखील ती आकडेवारी जनतेसमोर आलेली नाही. त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होत आहे, असं सांगतानाच नुकताच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत तसेच मंत्रिमंडळात चर्चा करण्यात आलेली आहे. यासाठी शासनाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी मेहनतीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे भुजबळांनी सांगितलं.

केंद्राच्या मदतीने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू

यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरही भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणाला आपला पाठींबा आहे. ओबीसी आरक्षणाला तसेच इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. ही मागणी सर्व पक्षीयांनी मान्य केली आहे. त्यानुसार सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. केंद्राच्या मदतीने हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. मराठा बांधवाना आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची आवश्यकता आहे. ही वाढ करण्यासाठी शासनाच्या वतीने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

…तर शेतकऱ्यांवर अन्याय

जिल्हा बँक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत नाही या विचारलेल्या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होत नसेल तर हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे. शासनाने जिल्हा बँकेला मुबलक प्रमाणात पैसे दिले असतांना बँकेच्या संचालक मंडळाने हे पैसे इतरत्र वळविले आणि आता ज्यावेळी शेतकऱ्यांना कर्ज वाटपाची वेळ आली. त्यावेळी शेतकऱ्यांकडूनच सक्तीची वसुली करण्यात येत आहे. त्यांच्या जमिनीचा तसेच वाहनांचा लिलाव करण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा तसेच मंत्री म्हणून माझा तीव्र विरोध आहे. नुकतीच याबाबत बैठक घेऊन कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. (chhagan bhujbal slams bjp over obc reservation issue)

 

संबंधित बातम्या:

शिवसेना-राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला काय? संजय राऊतांनी ‘रोखठोक’ सांगितलं!

उद्धव ठाकरेंचा फोन, ‘मिलना हैं, अब मेरे साथ दो साथी है’, मोदींचा लगोलग रिप्लाय; राऊतांच्या ‘रोखठोक’मधून इनसाईड स्टोरी

काँग्रेसमध्ये ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासोबत मी आहे; नितीन राऊतांचा कार्यकर्त्यांना ग्वाही

(chhagan bhujbal slams bjp over obc reservation issue)