Eknath Shinde : मी मुलाखत देईन त्या दिवशी राज्यात भूकंप होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

| Updated on: Jul 30, 2022 | 3:19 PM

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीदेखील आम्हाला पाठिंबा दिला आहे. तुम्ही लढवय्ये आहात. बाळासाहेबांचे नाव तुम्ही उज्ज्वल कराल, असे मोदी आपल्याला म्हणाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde : मी मुलाखत देईन त्या दिवशी राज्यात भूकंप होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
मालेगावात बोलताना एकनाथ शिंदे
Image Credit source: tv9
Follow us on

मालेगाव : आम्ही चुकलो असतो, तर आम्हाला लोकांनी समर्थन दिले नसते. गाडीतून जाताना तोंड फिरवले असते, असा दावा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. ते मालेगावात बोलत होते. बंडखोरांच्या मतदारसंघात सत्कार समारंभ आणि इतर कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्र्यांचे दौरे सुरू आहे. आज ते मालेगावात आहेत.  बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंची शिवसेना पुढे न्यायची आहे, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तर मी मुलाखत देईन त्या दिवशी राज्यात भूकंप होईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. तर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्याबाबत राजकारण झाले. त्याचा खुलासा लवकरच करणार असल्याचे शिंदे म्हणाले आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीदेखील आम्हाला पाठिंबा दिला आहे. तुम्ही लढवय्ये आहात. बाळासाहेबांचे नाव तुम्ही उज्ज्वल कराल, असे मोदी आपल्याला म्हणाल्याचे शिंदे यांनी सांगितले. माझे संपूर्ण भाषण त्यांनी ऐकले. मनापासून आपण भाषण केले, असे मोदी (Narendra Modi) म्हणाले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

‘आषाढी एकादशीची पूजा केली, त्याला भाग्य लागते’

आषाढी एकादशीची पूजा करायला मी पंढरपूरला गेलो होतो. भाग्य लागते त्याला, असे म्हणत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ते म्हणाले, की मी स्वत: ला भाग्यवान समजतो. तेथील विविध कार्यक्रमांना मी हजर होतो. ज्या ठिकाणी मी गेलो, तेथे रस्त्याच्या दुतर्फा हजारो माणसे होते. हात उंचावून त्यांनी माझे स्वागत केले. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास त्यांनी दिला, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तर आम्ही कोणालाही पळवले नाही. आम्ही कोणाचाही विरोध करत नाही, हिंदुत्व पुढे घेऊन जात आहोत, असे वक्तव्य त्यांनी केले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

उद्धव ठाकरेंना इशारा

राष्ट्रवादीकडून पराभूत झालेल्या आमदारांनाही निधी दिला गेला. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी आतापर्यंत लढलो, त्यांच्यासोबत मुख्यमंत्रीपदासाठी सोबत गेले. मग गद्दारी कुणी केली, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. विश्वासघात कुणी केला, याचा विचार करण्याची गरज आहे. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केले. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी कधी तडजोड केली नाही, त्यांच्या विचारांशी कुणी प्रतारणा केली, याचा विचार करण्याची गरज आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. त्यांच्या आणि माझ्यातील ज्या गोष्टी आहेत, त्या मी आज सांगणार नाही. मात्र एक दिवस मलाही तोंड उघडावे लागेल, मलाही भूकंप करावा लागेल, असा इशारा ठाकरेंना दिला. मी कधीही कोणावर खालच्या भाषेत बोलत नाही, मात्र अन्याय झाला तर सहन करणार नाही, असे ते म्हणाले. आनंद दिघेंबाबत झालेल्या राजकारणाचाही लवकरच खुलासा करणार, असा इशारा त्यांनी दिला.