
नाशिक : नाशिकच्या पदवीधर निवडणुकीसाठी (Nashik Padvidhar Election) ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यानंतर, सत्यजित तांबेंनीही (Satyajeet Tambe) प्रचार सुरु केलाय. विशेष म्हणजे, सत्यजित तांबेंना मविआचेच (MVA) घटक पक्ष असलेल्या कपिल पाटलांनी पाठिंबा दिलाय. पण भाजपचं काय ? सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्यावरुन एवढा सस्पेंस का आहे? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. नाशिकच्या पदवीधर निवडणुकीचं मतदान जसं जवळ येतंय, तसतशा घडामोडी वेगानं घडतायत. सत्यजित तांबेंना काँग्रेसनं पाठिंबा देण्यास नकार दिला. पण महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कपिल पाटलांच्या शिक्षक भारतीनं, सत्यजित तांबेंना पाठींबा दिलाय. सत्यजित तांबेंच्या संवाद मेळाव्यात आमदार कपिल पाटलांनी हजेरी आणि सत्यजित तांबेंना पाठिंबा दिला.
काँग्रेस विशेषत: प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना सुधीर तांबेंचा तीव्र संताप आलाय. सुधीर तांबेंना उमेदवारी देवूनही त्यांनी फॉर्म न भरल्यानं काँग्रेसनं त्यांना निलंबित केलं. तर बंडखोरी केल्यानं सत्यजित तांबेंनाही निलंबित करण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्याची माहिती आहे.
दुसरीकडे सत्यजित तांबेंनीही आपल्या कृतीतून काँग्रेसलाच सोडचिठ्ठी देणार असल्याचे संकेत दिलेत. सत्यजित तांबेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटरवरुन काँग्रेसला लोगो आणि काँग्रेसचा उल्लेख काढलाय. आणि पदवीधर मतदारांसाठी सत्यजित तांबेंनी एक संदेश लिहिलाय.
वारसाने संधी मिळते. पण कर्तृत्व हे सिद्ध करावचं लागतं. महाराष्ट्राला महान राष्ट्र म्हणून बघू इच्छिणारा एक युवक, असा संदेश सत्यजित तांबे यांनी लिहिलाय.
सत्यजित तांबेंसाठी शिक्षक आमदार कपिल पाटलांच्या शिक्षक भारतीचा पाठिंबा महत्वाचा आहे. पण भाजपचा पाठिंबा असणार की नाही ? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. भाजपवरुन मोठा सस्पेंस कायम आहे. कारण उमेदवारी अर्ज भरताच सत्यजित तांबेंनी फडणवीसांकडे पाठिंब्याची मागणी केली होती. मात्र बावनकुळे अजूनही म्हणतायत की सत्यजित तांबेंनी अजून पाठिंबाच मागितला नाही.
नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील विरुद्ध सत्यजित तांबे अशीच थेट लढत आहे. तर काँग्रेसचा शुभांगी पाटलांनाच पाठिंबा जवळपास निश्चितच आहे. उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा सुरु असल्याचं नाना पटोले म्हणालेत.
नाशिकमध्ये तांबेंच्या उमेदवारीवरुन झालेल्या घोळामुळं काँग्रेसमध्येच 2 गट पडल्याचं दिसतंय. काँग्रेसचे सचिव राहुल दिवेंनी सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्याची मागणी केली. आशिष देशमुखांनी तर सत्यजित तांबेंच्या समर्थनात उतरत नाना पटोले यांच्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मलिल्कार्जुन खर्गेंकडे तक्रार केलीय.
काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाणांचा सूरही सत्यजित तांबेंच्याच बाजूनं आहे. नाशिकमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असं अशोक चव्हाण म्हणतायत
एबी फॉर्म मिळूनही सुधीर तांबेंनी स्वत: अर्ज दाखल न करता, मुलगा सत्यजितचा अपक्ष अर्ज दाखल केला. इथंच काँग्रेसची किरकिरी झाली. त्यातच सुधीर तांबेंवर निलंबनाची कारवाई करुनही, सत्यजित तांबेंसाठी काँग्रेसमध्येच 2 गट झालेत. ही काँग्रेससाठी आणि पटोलेंसाठीही डोकेदुखी आहे.