Nashik Ajit Pawar : हे कायद्याचं राज्य, इथे कोणाची हुकूमशाही चालणार नाही; राज ठाकरेंच्या अल्टिमेटमवर अजित पवारांचा इशारा

| Updated on: May 02, 2022 | 4:09 PM

मी म्हणेल तेच होणार, हे शक्य नाही. विविध समाजाचे लोक राहतात. कायदा सर्वांना सारखाच आहे. तो मोडल्यास कारवाई होणार असल्याचा इशारा अजित पवारांनी दिला आहे. राज ठाकरेंच्या सभेविषयी पोलीस त्यांचे काम करतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Nashik Ajit Pawar : हे कायद्याचं राज्य, इथे कोणाची हुकूमशाही चालणार नाही; राज ठाकरेंच्या अल्टिमेटमवर अजित पवारांचा इशारा
राज ठाकरेंवर टीका करताना अजित पवार
Image Credit source: tv9
Follow us on

नाशिक : अल्टिमेटम (Ultimatum) वगैरे काही नाही. हे कायद्याचे राज्य आहे. इथे कोणाची हुकूमशाही चालणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. राज ठाकरे यांची काल औरंगाबादेत सभा झाली. यावेळी त्यांनी आपल्या तीन तारखेच्या अल्टिमेटमवर ठाम असल्याचे सांगितले होते. तीन तारखेनंतर मशिदीवरचे भोंगे काढावे लागतील, अन्यथा त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावणार असल्याचे ते म्हणाले होते. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सभाकुणीही असो, कायद्याने, नियमाने ज्या गोष्टी घालून दिल्या आहेत. त्याचे पालन सर्वांनी करायचे आहे. नियम लावले तर सर्वांनाच लावले जातील. फक्त मशिदींवरचे भोंगे काढायचे आणि इतर ठिकाणचे काढले जाणार नाहीत, असे कसे होईल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

‘कायदा सर्वांना सारखाच’

पोलिसांनी पोलिसांचे काम करावे. जर सभेमध्ये कायद्याचे पालन केले असेल तर ठीक मात्र जर कायद्याचे उल्लंघन असेल तर कारवाई होईल, असे अजित पवार म्हणाले आहेत. निवडणूकीपूर्वी राज भाजपाविरोधात बोलत होते. आता त्यांचे मत परिवर्तन झाले आहे. उद्या केसेस कार्यकर्त्यांवर होणार आहेत, असे अजित पवार म्हणाले आहेत. तसेच मी म्हणेल तेच होणार, हे शक्य नाही. विविध समाजाचे लोक राहतात. कायदा सर्वांना सारखाच आहे. तो मोडल्यास कारवाई होणार असल्याचा इशारा अजित पवारांनी दिला आहे.

‘…तर ते महाराष्ट्राला परवडणारे नाही’

कोर्टाने सांगितल्याप्रमाणे सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत परवानगी आहे. त्याप्रमाणेच सर्व सुरू आहे. मात्र ते शिवतीर्थावर बसून बोलतील. लोकांना भाषण करून भडकवून देणे सोपे असते. मात्र त्यामुळे जातीयवाद निर्माण होणार असेल, समाजात तेढ निर्माण होणार असेल तर ते महाराष्ट्राला परवडणारे नाही, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले. दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेविषयी पोलीस त्यांचे काम करतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.