
Ashok Kharat Mirgaon Farm house: भोंदू अशोक खरात याचे नाशिकसह अहिल्यानगर जिल्ह्यात मोठे नेटवर्क असल्याचे उघड होत आहे. त्याने राजकीय दबावातून अनेक जमीन बळकावल्या. तर अनेकांना दमदाटी केली. त्याच्यासह नातेवाईकांच्या नावावर 52 मालमत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान मिरगावमध्ये या भोंदूबाबाचा मोठा फार्महाऊस आहे. काल येथील ग्रामस्थांनी खरात आणि कुटुंबाला गावबंदीचा ठराव समोर आणला. तर आता येथील फार्महाऊसवर त्याने काय काय काळी कृत्य केली आहेत, हे समोर येणार आहे.
वॉचमन,कर्मचारी, पुजाऱ्याची चौकशी
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे अशोक खरात याचा फार्महाऊस आहे. भोंदू बाबा अशोक खरातच्या मिरगाव येथील फॉर्म हाऊसच्या वॉचमन, साफसफाई कर्मचारी आणि मंदिरातील पुजारी यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. नाशिक येथे चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आले आहे. वॉचमन बालाजी, कर्मचारी प्रमोद आणि मंदिर पुजारी यांना चौकशीसाठी बोलावल्याची माहिती दिली आहे.
खरात प्रकरणी एसआयटीचे अधिकारी चौकशीसाठी हिमांशू पोलीस क्लब येथे दाखल झाले आहेत. अशोक खरातची आज पुन्हा करण्यात SIT मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. एसआयटी सोबतच आयकर विभागाचे अधिकारी देखील अशोक खरातची चौकशी करण्याची शक्यता आहे.
नांदेडमध्येही भोंदूबाबावर गुन्हा दाखल
विधवा महिलेला लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या महाराजावर नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. नांदेड शहरातील एका मठातील 39 वर्षीय हरिगिरी दत्तगिरी महाराजावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका 46 वर्षीय महिलेला लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप या महाराजावर पीडितेने केलाय. जुलै 2025 पासून एका महिलेला लग्नाचे अमिष दाखवत तीन वेळा अत्याचार केल्याच पीडित महिलेने तक्रारीत म्हटलंय. या महाराजावर गुन्हा दाखल झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आलंय. भोंदू बाबा कॅप्टन खरातचे प्रकरण गाजत असतांना नांदेडात एका महाराजावर गुन्हा दाखल झाल्याने भाविक भक्तांमध्ये खळबळ माजलीय.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ज्योती मेटे?
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकरणाचे पडसाद उमटताच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे आता महिला आयोगाच्या रिक्त अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील एक नाव जोरदार चर्चेत आले आहे. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संधी द्यावी, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरताना दिसत आहे. त्यांच्या समर्थनार्थ पोस्टही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.