
मुलांच्या शिक्षणाचा दर्जा आणि पाया ढासळल्याचा आरोप सातत्याने होत आहे. काही संस्थांनी राज्यात केलेल्या सर्व्हेक्षणात दहावीच्या विद्यार्थ्यांचे गणित कच्चं असल्याचे समोर आले होते. तर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना जोडाक्षरांचा ताळमेळ घालता येत नसल्याचे दिसून आली. शिक्षणातील ही हा विनोद कुठे जाऊन सांगावा असे झाले असतानाच विद्यार्थ्यांच्या दप्तरात आता नको त्या वस्तू आढळल्याने शिक्षणाचा आयचा घो म्हणण्याची वेळ पालकांवर आली आहे.
विद्यार्थ्यांचे गणित कोलमडले
गुणाकार-भागाकाराने विद्यार्थ्यांचे गणित कोलमडले आहे. काही विद्यार्थ्यांना ढकलपास केल्याचे दुष्परिणाम दिसून येत आहे. उच्च माध्यमिकमधील अनेक विद्यार्थ्यांचे गणित कच्चं असल्याचे अहवाल समोर आले आहेत. त्यांना साधी वजाबाकी, बेरीज करताना नाकीनऊ येत असल्याचे दिसून येत आहे. हातचे किती उरले? हा प्रश्न सुद्धा विद्यार्थ्यांना डोईजड झाल्याचे याविषयीच्या अहवालात समोर आले होते. ग्रामीणच नाही तर निमशहरी भागातही शिक्षणाचा झेंडा आडवा झाला आहे.
शिक्षण क्षेत्रात मजूरांचा ट्रेंड
बुलडाणा जिल्ह्यातील एका शाळेत तर शिक्षिकांनी त्यांच्या जागेवर मजूर स्त्रीया शिकवण्यासाठी ठेवल्याचे समोर आले होते. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी याविरोधात तक्रारीचा सूर आळवला होता. अनेक भागात कमी अधिक प्रमाणात अशा तक्रारी आहेतच. तर काही ठिकाणी शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांना अव्वल दर्जा सुद्धा मिळवल्याचे चित्र आहे.
विद्यार्थ्यांच्या दप्तरात आढळल्या या वस्तू
नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी परिसरातील घोटीच्या एका खाजगी शाळेत नववीच्या ५ ते ६ विद्यार्थ्यांच्या दप्तरात फायटर, चाकू, सायकलची चेन, लोखंडी कडे, निरोध व तंबाखू जन्य पदार्थ आढळले. उपमुख्याध्यापकांनी अचानक दप्तराची तपासणी केल्याने हा प्रकार समोर आला.
त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवणे धाडण्यात आले. त्यांच्यासमोरच या विद्यार्थ्यांना समज देण्यात आली. तर चित्रविचित्र हेअर स्टाईल करून येणार्या विद्यार्थ्यांचे केस सुद्धा उपमुख्याध्यापकांनी कापले. विद्यार्थ्यांना शिस्त लागावी यासाठी यापुढेही ही तपासणी अशीच चालू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आता दररोज तपासणी करण्यात येईल.